पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४१]

ठरते. मनुष्यापासून जो पृथक असतो, जो थोडया फार अंशानें दुर्मिळ असतो व जो एखाद्याच्या खासगी मालकीचा झालेला असतो असा मानवी वासना तृप्त करणारा पदार्थ म्हणजे संपत्ति होय.
 आतां जरी संपत्तीची वरील गुणवाचक कल्पना एकच असली तरी समाजाच्या निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणें संपत्ति या सदरांत मोडणा-या वस्तू मात्र फार भिन्न भिन्न असतात. समाजाच्या बाल्यावस्थेंत मनुष्याच्या गरजा किंवा वासना फारच अल्प असतात व त्याच्या आयुष्यक्रमांत व उत्क्रांतितत्त्वाप्रमाणें त्याच्या खालच्या वर्गाचे जे पशु त्यांच्या आयुष्यक्रमांत फारसें अंतर नसतें. या समाजाच्या स्थितीला समाजशास्त्रकार मृगयावृत्ति म्हणतात. या स्थितीमध्यें मनुष्य शिकार करून आपली भूक भागवितो व झाडाच्या ढोलींत राहतो. या स्थितींत संपत्तीची वाढ शक्यच नसते. याच्या पुढची पायरी म्हणजे गोपालवृत्ति होय. यामध्यें लोकांची स्थाथिक अशी कोठेंच वसति नसते. त्यांचीं गुरेंढोरं व शेळ्यामेंढ्या यांच्यावर उपजीविका चालते व जेथें जेथें नवीं नवीं कुरणें सांपडतात तेथें तेथें लोक आपली राहण्याची जागा बद्लीत असतात. या स्थितीमध्यें गुरेंढोरें व शेळ्यामेंढ्या व त्यांचें दूधदुभतें व लोंकरकातडीं हेच संपत्तीचे जिन्नस असतात. ज्याच्याजवळ हीं पुष्कळ असतात ती श्रीमंत अगर सधन समजला जातो. या वृत्तीचा निदर्शक संस्कृतांतील दुहितृ हा शब्द आहे. दूध काढणें हें त्या काळीं मुलीचें काम असावें व म्हणूनच दुहिता-दुध काढणारी-या शब्दाचा पुढें मुलगी असा अर्थ झाला असावा. याच्यापुढील समाजाची पायरी म्हणजे कृषिवृत्ति होय. यामध्यें समाजांतील लोक एका प्रदेशांत स्थायिक होतात व तेथें शेतकीवर उपजीविका करून राहतात. या समाजाच्या पायरीमध्यें समाजाच्या पुष्कळ गरजा वाढलेल्या असतात; व त्या त्या गरजा भागविण्याकरितां पुष्कळ पदार्थ तयार केले जातात. तरी पण या पायरीवर समाज असतांना समाजांत वासनांची वाढ फार झालेली नसते; परंतु याची पुढील पायरी जी उद्योगवृत्ति तो समाजाच्या औद्योगिक पूर्ण वाढीचा काळ होय. यामध्यें समाजाच्या वासनांची पुष्कळ वाढ झालेली असते व ती ती वासना तृप्त करणयाकरितां हजारों धंदे निर्माण झालेले असतात; व यामुळे नानातन्हेची संपत्ति देशांत निर्माण होऊं लागते.