पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/528

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [५१२ ] नतीबद्दल उद्गार काढतात ते जास्त अन्वर्थक रीतीनें या पर्वाला लागू आहेत. कंपनी सरकारच्या अमलांत कांहीं स्वाभाविक व कांहीं छत्रिम अशा कारणांनीं हिंदुस्थानच्या सांपत्तिक भरभराटीचा नाश होऊन हिंदुस्थान एक कच्चा माल तयार करणारा व शेतकीवर पूर्ण अवलंबून असणारा देश बनला; परंतु याच्या पुढल्या पर्वांत ही स्थिति कांहीं अंशानें तरी सुधारली हें खास आहे. त्यांतही भरतीओहोटीप्रमाणें प्रकार झाला आहे. ह्मणजे या ६० वर्षांपैकीं कांहीं वर्षांमध्यें देशाची सांपत्तिक बाबतींत प्रगति झाली तर कांहीं वर्षात पुन्हा पीछेहाट झाली व सांपत्तिक स्थितीचा व व्यापाराचा क्रम नेहमीं भरतीओाहाटीसारखाच चालतो. ज्याप्रमाणें समुद्राच्या किना-यावर उभे राहिलें असतां लाटांची गति मागेंपुढें होत असतांना दिसते. परंतु भरतीची वेळ असली ह्मणजे एकंदर पाणी वरच चढत असतें, तोच प्रकार देशाच्या सांपत्तिक स्थितीचें आहे. थोडया थोडया वर्षांची अवधि घेऊन देशाच्या सांपत्तिक स्थितीचें निरीक्षण बरोबर होणार नाहीं, त्याला बराच मोठा अवधि घेतला पाहिजे व तसा अवधि म्हणजे १८५० पासून आजपर्यंतचा आहे. तेव्हां आतां या काळांतील हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीचें निरीक्षण केलें पाहिजे व प्रथमतः यापूर्वींच्या सर्व पर्वांपेक्षां या काळाचे विशेष काय आहेत हें पाहिलें पाहिजे.

    प्रथमतः सर्व देश एका छत्राखालीं आला. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व द्वारकेपासून पुरीपर्यंत सर्व देश सुधारलेल्या राज्यपद्धतीखालीं आला व या सरकारनें सरकारचें प्रथम कर्तव्यकर्म जें जीवित व मालमत्ता यांचें संरक्षण तें उत्तम प्रकारें केले. या सर्व काळांत देशांत केव्हांही लढाई झाली नाहीं. १८५७ सालच्या बंडाची धामधूम थोडे दिवस झाली. परंतु ती क्षणिकच होती; परंतु त्यानें देशाच्या अतःशांततेला ह्मणण्यासारखा अडथळा आला नाहीं. देशांतील पूर्ण शांतता, दंग्याधोप्याचा अभाव व जीविताची व मालमत्तेची सुरक्षितता हीं, या पर्वांत पूर्णपणें अमलांत आलीं. ही गोष्ट निर्विवाद आहे व या ग्रंथाच्या दुस-या पुस्तकांत सांगितल्याप्रमाणें अशी देशाची शांततेची स्थिति ही एक संपत्तीच्या उत्पादनाचें अमूर्त कारण होय. तेव्हां या कारणापुरता विचार करतां या पर्वांत देशामध्यें संपत्तीची वाढ झाली असली पाहिजे व तशी ती झाली आहे असें म्हणणें भाग आहे व ती हिंदुस्थानच्या वाढत्या