पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/524

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५०८] कशी कां असेना, देशांत दंगेधोपे कां असेनात व राज्यकारभार कितीही वाईट तऱ्हेचा कां होईना त्याबद्दल खरी काळजी त्यांना नसे. होतांहोईल तितके कर वसूल करून जितके जास्त पैसे मिळतील तितके जास्त पैसे मिळविण्याकडे त्यांची प्रवृत्ती.डायरेक्टरांची इच्छा हिंदू लोकांना चांगल्या तऱ्हेने वागविण्याची नव्हती असें नाहीं. यामुळे कंपनीच्या डायरेक्टरांच्या इकडील गव्हर्नरांना आलेल्या हुकुमांमध्यें परस्पर विरोध असे. त्याची मेकॅलेनें मजेदार थट्टा उडविली आहे. त्याच्या मतें सर्व हुकुमांचें सार हें कीं, "प्रजला न्यायानें वागवा पण पैसा पाठवा, देशांत शांतता ठेवा; पण पैसा जास्त पाठवा. या लोकांवर जुलूम करूं नका, पण पैसा पाठवा.' कंपनीचे नोकर यांपैकीं कोणचा हुकूम पाळीत असतील हें उघडच आहे. येथें राहणाऱ्या लोकांना हिंदुस्थान ह्मणजे सोन्याची खाण नाहीं असें दिसून येई. तेव्हां कंपनीला पैसे जास्त कसे पाठवावयाचे. अर्थात लोकांना दाबून त्यांच्यावर जास्त कर लादून व राज्यकर्त्यांचीं कर्तव्यकर्मे सोडून देऊन हें उघड आहे.

  तरी हिंदुस्थानचें राज्य कंपनी सरकारच्या ताब्यांत असे तोंपर्यंत त्या सरकारवर एक तरी दाब होता व तो दाब इंग्रजी पार्लमेंटाचा होय. कंपनी सरकारची सनदेची मुदत प्रत्येक २० वर्षांनीं सरे व पुनः फेर सनद करून घ्यावी लागे व त्या वेळीं पार्लमेंटांत वादविवाद होऊन ती कपनीला परत मिळे.कंपनीसारख्या एका खासगी संस्थेच्या हातीं एवढा मोठा राज्याधिकारी असावा याचा इंग्रजी मुत्सद्यांना व पार्लमेंटाच्या मेंबरांना मोठा हेवा वाटे. यामुळे प्रत्येक सनदेच्या वेळी कंपनी सरकारच्या राज्यकारभारपद्धतीवर कडक टीका होत असे. यामुळेच हिंदुस्थानच्या कंपनी सरकारच्या अमलांत प्रत्येक वीस वर्षांनीं कांहीं तरी हितकर सुधारणा घडून येत असत.
   येथपर्यंत हिंदुस्थानच्या औद्योगिक इतिहासाच्या दुस-या पर्वांत हिंदु स्थानच्या कारागिरीची व उद्योगधंद्यांची अवनति कां व कशी झाली याचें थोडक्यांत विवेचन केलें. आतां शेतकी व शेतकरी वर्ग यांची व इतर वर्गांची या पर्वात काय स्थिति झाली याचा विचार केला पाहिजे. ह्मणज एकंदर बहुजनसमाजाच्या या पर्वातील सांपत्तिक स्थितीचा अंदाजकरण्यास ठीक पडेल.