पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/521

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ५०५ ] वस्तू व पक्का माल इंग्लंडमध्यें होऊं लागला तो तो माल हिंदुस्थानांतील कारागिरांना करूंच द्यावयाचा नाहीं असे सक्त नियम केले गेले. परंतु इंग्लंडच्या सुदैवानें पुढें हे सत्तांचे नियम करण्याची गरज राहिली नाहीं. कारण इंग्लंडमध्ये१७५० नंतरच्या थोड्या काळांत धंद्याची क्रांति करणारीं अशीं यंत्रे व उपकरणें अस्तित्वांत आलीं व विशेषतः विणकरांच्या धंद्याची फारच प्रगति झाली. त्यांतच वाफेच्या शक्तीच्या शोधाची भर पडली. एंजिनें तयार झाली. यामुळे हातमागाची व मनुष्याच्या श्रमानें कापड करण्याच्या धंद्याची पिछेहाट होऊन वाफेच्या शक्तीनें चालणारे प्रचंड कारखाने निघूं लागले. या कारखान्यांत श्रमविभागाच्या तत्वाच्या योगानें तसेंच सृष्टीच्या स्वाभाविक शक्तीच्या उपयोगाच्या योगानें मनुष्याच्या स्वतःच्या श्रमाच्यापेक्षां किती तरी पट जास्त माल होऊ लागून तो स्वस्तही पडूं लागला. यामुळे हातमागाच्या मालाचा या मालापुढें टिकाव निघेना व विणकरी लोकांचा धंदा या असम चढाओढीत आपोआपच बुडत चालला. त्याप्रमाणें युरोपामध्यें धातूच्या खाणी सांपडून अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू काढण्याच्या सुलभ कृतीचा शोध लागला. या सर्व प्रकारच्या धातू बाहेर देशांतून आलेल्या येथल्यापेक्षां स्वस्त पडू लागल्या. म्हणून धातू गाळणाऱ्या जातीचा धंदा बुडाला. आणखी रसायनशास्त्राच्या शोधाने नवीन व सहज होणारे रंग पैदा झाले व म्हणून रंगाऱ्यांचाही धंदा बुडाला. याप्रमाणें एक एक धंदा नाहींसा होत जाऊन सर्व लोकांचा मारा शेतकीवर पडत चालला व हिंदुस्थानामध्यें पहिल्या पर्वांत जें धंद्यांचें बहुविधत्व होतें तें दुस-या पर्वांत हृळूहळू नाहीसें होऊन हिंदुस्थान देश कच्चा माल तयार करणारा व केवळ शेतांवर अवलंबून असणारा कृषिवृत्ति देश बनत चालला. वरील म्हणण्याच्या समर्थनार्थ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंपेरीयल गाझीटीयरच्या तिस-या भागांतून तीन उतारे खालीं नोटेंत दिले आहेत. त्याच पुस्तकावरून देशांतील लोकांचा शेतीवरच मारा कसा होत चालला याचा अांकडा दिला आहे. १८९१च्या खानेसुमारींत शेतकीवर अवलंबून असणा-या लोकांचें प्रमाण ६२ होतें तेंच १९०१ मध्यें ६८ वर गेलें म्हणजे अवघ्या दहा वर्षात शंभरांपेकीं सहा लोकांना इतर धंदे सोडून शेतकीकडे धांव घ्यावी लागली. या सर्व कारणांनीं या पर्वांमध्यें हिंदुस्थानची औद्योगिक व सांपत्तिक स्थिति अगदीं नीचीची होती हें निर्विवाद सिद्ध होतें.