पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/520

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५०४] थोडी आधीं गति मिळाली. कारण इंग्लंडमध्ये अन्तःशांतता युरोपच्या इतर राष्ट्रांच्या आधीं प्रस्थापित झाली. इंग्लंडमध्येही प्राटेस्टंट व रोमन कॅथलिक धर्मामुळे आपापसांतलीं युद्धे व कलह झाले खरे; तरी पण इलिझाबेथ राणीच्या राज्यापासून इंग्लंडमध्ये पूर्ण शांतता नांदू लागली व जरी इंग्लंडचा सरकारी असा एक धर्मपंथ राहिला तरी बाकीच्या पंथांना संरक्षण मिळू लागले. कारण तेथे सहिष्णुता होती. यामुळे फ्रान्स, हॉलंड, नेदर्लंड वगैरे देशांमधील औद्योगिक बाबतींत थोडे पुढे असलेले कारागिर लोक इंग्लंडमध्यें सुरक्षित स्थळ व धार्मिक छळापासून मुक्त असे ठिकाण म्हणून राहू लागले. इंग्लंडच्या राजांनी सुद्धां त्यांना उत्तेजन दिलें. हें होईपर्यंत इंग्लंड हा कच्चा माल तयार करणारा देश होता. तेथून धान्य व लोकर लोखंड व कातडीं हे जिन्नस बाहेरदेशी जात.परंतु पुढे लोंकरीच्या विणकरांचा धंदा तेथे उदयास येऊ लागला. तसेच फ्रान्समधल्या रेशमी कापडाचा धंदाही सुरू झाला व पुढे कापसाच्या कापडाचाही धंदा सुरू झाला. नंतर लोखंड व कोळसे हे दोन पदार्थ महत्त्वाचे झाले व त्यांच्या खाणी इंग्लंडांत सांपडल्या; व या धंद्यात नवीन नवीन शोध लागून इंग्लंडचा माल बराच चांगला होऊ लागला. धंद्याची ही सर्व प्रगति इंग्लंडनें संरक्षण तत्वानेच संपादन केली. कारण हिंदुस्थानचा सुबक माल जरी इंग्लिश व्यापारी हिंदुस्थानांतुन नेत तरी तो ते आपल्या देशांत खपवीत नसत. कारण अशा मालावर जबर जकाती असत. तो माल ते युरोपियन राष्ट्रांमध्ये खपवीत याप्रमाणे इंग्लंडने हिंदुस्थानच्या उत्तम मालाने युरोपांतले उद्योगधंदे बुडविले व संरक्षणाच्या योगाने आपले मात्र सुस्थितीला आणिलें. याप्रमाणे इंग्लंडमध्ये उद्योगधंद्याची वाढ होत असतांनाच इंग्लंडनें अमेरिकेत व इतर ठिकाणीं वसाहती स्थापल्या व हिंदुस्थानांत कंपनी सरकारच्या राज्यास प्रारंभ होऊन त्याचा विस्तार होऊ लागला. ईस्ट-इंडियाकंपनीची स्थिति अर्ध्ये व्यापारी व अर्ध्ये राज्यकर्ते अशी झाली. वसाहतींनी इंग्लंडला धान्य व कच्चा माल पुरवावें अशा प्रकारचे धोरण इंग्लंडच्या मुत्सद्यांनी व व्यापाऱ्यांनी सुरू केले. अमेरिकेमध्ये इंग्लंडच्या वसाहती त्याच्या हातून जाण्यास हे धोरण कारण झाले. हिंदुस्थानासही हेंच धोरण लागू केले गेले, व कंपनी सरकारने या धोरणानुरूप जाणूनबुजून व बुद्धिपुरस्कार हिंदुस्थानांतील कलाकौशल्यास मारण्याचा प्रघात ठेविला. ज्या ज्या