पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/514

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४९८] कडील आहे व रानटी स्थितीपासून हल्लींच्या भरभराटीच्या स्थितीमधला काल फारसा मोठा नाहीं. हीं राष्ट्रे जी एकदा सुधारणेच्या मार्गला लागली तीं सारखीं वरवर चढतच गेलीं व आतांपर्यंत त्यांचा वर चढण्याचा क्रम चालूच आहे. हिंदुस्थानची गोष्ट याहून फार निराळी आहे. हा देश फार पुरातनकालचा आहे, येथली सुधारणाही फार जुनी आहे व ती विशिष्ट सुधारणा फार जुन्या काळींच शिखरास पोहोंचली होती व या सुधारणेस अचल स्वरूप आल्यानंतर तिचा दुस-या लोकांशीं व दुस-या सुधारणांशी संबंध आला व ब्रिटिश अंमलामधील हिंदुस्थानची सध्याची स्थिति या दोन सुधारणांच्या मिश्रणानें बनलेली असल्यामुळे हिंदुस्थान हल्लीं एका प्रकारच्या संक्रमणावस्थेंत आहे; तेव्हां या दोन सुधारणांच्या मिलाफानें हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीवर काय इष्टनिष्ट परिणाम झाले आहेत हें प्रथम पाहिंले तरच आपल्याला त्याच्या सद्यः सांपत्तिक स्थितीची यथार्थ कल्पना येईल. तेव्हां आपल्याला हिंदुस्थानच्या अर्वाचीन काळचें सिंहालोकन केलें पाहिजे. हिंदुस्थानच्या अर्वाचीन काळचा प्रारंभ म्हणजे वास्केदिगामानें हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढला त्या सालापासून होय. तेव्हांपासून युरोपाशीं हिंदुस्थानचा जास्त निकट संबंध येऊं लागला व दोघांमध्यें जोराचा व्यापार सुरू झाला. तेव्हांपासून आजपर्यंतचा काळ म्हणजे हिंदुस्थानचा अर्वाचीन काळ होय व या काळाबद्दल थोडीफार माहिती उपलब्ध आहे. आतां औद्योगिक दृष्टीनें या काळाचीं तीन पर्वे पडतात. पहिलं १५ व्या शतकापासून १७५० पर्यंत, दुसरें १७५० पासून १८५० पर्यंत व तिसरें पर्व म्हणजे गेल्या ६० वर्षांचें होय. यांत पहिलें पर्व २५० वर्षांचें आह, दुसरें १०० वर्षांचें आहे व तिसरें ६० वषाचें आहे. पहिल्या पर्वांतच हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या सत्तेचा उदय व भरभराटीचा काळ पडतो व या काळांत युरोपांतील निरनिराळ्या राष्ट्रांचा हिंदुस्थानांत व्यापाराच्या दृष्टीनें प्रवेश झाला होता. १७५० ते १८५० या शंभर वर्षांचा काळ हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्यस्थापनेचा काळ होय. या शंभर वर्षात ईस्ट इंडिया कंपनीनें बहुतक सर्व हिंदुस्थानचें साम्राज्य संपादन केले. याच काळांत युरोपामध्यें उद्योगधंद्यांत निरनिराळे शोध लागून युरोप व विशेषतः इग्लंड यांची औद्योगिक भरभराट झाली. तिस-या पर्वामध्यें हिंदुस्थानचें