पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/511

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४९५] त्याला फक्त बेशुद्ध स्थितीत पाहिला असेल तो डॉक्टर असें म्हणणार कीं, हा मनुष्य आतां शुद्धीवर आला आहे,तेव्हां याची प्रक्रति सुधारण्याच्या मार्गाला लागलेली आहे व योग्य जोपासना केल्यास हा मनुष्य पुनः निरोगी व सुदृढ होण्यास हरकत नाही. परंतु अशा वेळीं रोग्यास कसे वाटतें असें विचारल्यास तो म्हणतो, मी अत्यंत अशक्त झालों आहे व माझी प्रकृती फारच बिघडली आहे. रोग्याचें हे म्हणणे बरोबर आहे, कारण त्याला ज्या आपल्या प्रकृतीची आठवण आहे, त्यापेक्षां हल्लीची प्रकृति वाईट आहे हे अगदीं उघड आहे. परंतु मध्यंतरी त्याची प्रकृति हृल्लींपेक्षाही जास्त बिघडली होती. परंतु त्या वेळीं तो बेशुद्धीत असल्यामुळे त्याची त्याला स्मृति नव्हती. या स्थितींत डॉक्टर व स्वतः रोगी या दोघांचेंही म्हणणे कांहीं कांहीं अंशी खरे आहे असे निष्पक्षपाताने विचार करतां कबूल करणे प्राप्त आहे. हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीला व तिच्या निदानाला हा दाखला चांगला लागू पडतो हे पुढील विवेचनावरून स्पष्ट दिसून येईल. परंतु या विषयासंबंधानें तीव्र मतभेद आहे व त्यामुळे यामधून सत्य शोधून काढणें हें कठीण व अडचणीचे काम आहे हें सहज दिसून येणार आहे या विषयाविवेचनाच्या अडचणीचे शेवटचे कारण आगंतुक आहे. या विषयाला हल्ली हिंदुस्थानच्या विशेष परिस्थितीमुळे फार नाजूक स्वरूप आलेले आहे. वरच्या कलमांतील दाखलाच पुढे चालवून त्या नाजूक स्वरूपाचें स्पष्टीकरण करतां येईल. रोगी पुष्कळ दिवस आजारी पडलेला असावा, व ङॉक्टर त्याची पहिल्यापासून शुश्रूषा व औषधोपचार करीत असावा. अशा स्थितींत पहिल्यांदा रोगी डॉक्टराचे आभार मानीत असतो. कारण त्याला डॉक्टराबद्दल फार आदरबुद्धि असते; परंतु दुखणें खितपत पडले व डॉक्टराचे औषध सारखें चालू असतानाही रोग्याला गुण वाटत नाहींसा झाला म्हणजे रोगी डॉक्टरवर रागावू लागतो. "इतके दिवस झाले तुमचे सारखें औषध चालू आहे,तुमची सुधारलेली शस्त्रक्रिया चालू आहे,तुमची सारखी शुश्रूषा चालू आहे तरी मला गुण येत नाही,तेव्हां तुम्ही औषधे बरोबर देत नाही. माझा सावकाशपणे परंतु जीव जावा अशीच तुमची योजना आहे. तेव्हां तुमच्या इतक्या महागऱ्या पद्धतीची मला जरूरी नाही" असे रोग्याने त्राग्याने म्हटले तर डॉक्टर संतापतो व