पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४६८] व्यापारधंदे सुरू करतां येतात, तेव्हां या राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीनें व्यापारधंद्यांस धोका न बसतां उलट उत्तेजनच मिळतें. तसेंच राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीनें देशांतील पेढ्यांच्या व्यापारास चांगला अवसर मिळतो व पेढ्या देशांतील लोकांचें भांडवल वाढविण्यास व अप्रत्यक्ष रीतीनं व्यापारधंद्याच्या वाढीस कारणीभूत होतात हें महशूर आहे. राष्ट्रीय कर्जावर द्याव्या लागणा-या व्याजाचा एक बोजा आहे असें सकृद्दर्शनीं वाटतें खरें; परंतु यानें देशाचें काडीभरही नुकसान होत नाहीं; कारण सरकार कराच्या रूपानें कांहीं लोकांकडून पैसे घेतें व व्याजाच्या रूपानें ते कांहीं लोकांस देतें, म्हणजे 'ताटांतलें वाटीत आणि वाटींतलें ताटांत' अशांतलाच हा प्रकार होतो. या पद्धतींत नुसती पैशाची अदलाबदल होते व यानें देशाचें नुकसान न होतां कांहीं अंशीं फायदाच होती. तसेंच या राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीनें देशांतील सुखवस्तु लोकांना आपल्या शिलका फायदेशीर रीतीनें ठेवण्याचें एक सुलभ, खात्रीचें व सोयीचें साधन होतें. या कारणांकरितां कराच्या पद्धतीपेक्षां कर्जाची पद्धत श्रेयस्कर आहे अशा प्रकारचें अनुमान कांहीं लोकांनीं काढलेलें आहे असें अॅडाम स्मिथ यानें आपल्या पुस्तकांत निर्दिष्ट केलें आहे. अॅडाम स्मिथच्या मतानें कराच्या पद्धतीपेक्षां कर्जाची पद्धति जास्त नुकसानीची व देशाच्या व्यापारधंद्याला हानिकारक आहे व ह्मणून होतां होईल तों या पद्धतीचा अंगीकार करूं नये व केल्यास अपरिहार्य गोष्ट ह्मणूनच करावा असा अॅडाम स्मिथ यानें आपला अभिप्राय दिलेला आहे. अॅडम स्मिथचे मतें राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीनं नवीन भांडवल तयार होतें हा समज भ्रममूलक आहे. कारण, सरकाराला कर्ज मिळतें तें देशांतील भांडवलांतूनच मिळूर्ते व सरकारानें कर्ज काढलें नसतें तर हें भांडवल नवीन धंद्यांच्या वृद्धीकडे खर्च झालें असतें. तेव्हां कर्जानें जुनें भांडवल नष्ट होतें हें विसरतां कामा नये. इतकें खरें कीं, कर्जाच्या पद्धतीच्या योगानें प्रजेची शिल्लक टाकण्याची शक्ती फारशी कमी होत नाही; म्हणून जरी सरकार आपल्या अनुत्पादक खर्चानें देशांतील भांडवल जलदीनें नष्ट करीत असलें; तरी तितक्याच जलदीनें तें देशांत प्रजेच्या शिलकेच्या रूपानें वाढत असतेंव म्हणून या कर्जापासून देशाच्या उद्योगधंद्यावर वाईट परिणाम होत नाही. तसेच राष्ट्रीय कर्जावरील व्याजानें देशाचें मुळींच नुकसान होत नाही,