पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४६७] रेल्वे व रस्ते यांकरितांही कर्ज काढणें रास्त आहे. सारांश, जीं कामें खासगी माणसांकडून होणें शक्य नाही, परंतु जीं अत्यंत लोकोपयोगी आहेत, त्या सर्व बाबतींत राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीचा अवलंब करतात व यामध्यें पुढील पिढ्यांवर गैरवाजवी बोजा बसत नाहीं. कारण ह्या सर्व कामांचा पुढील पिढ्यांना फायदा मिळतो; उलट अशीं मोठीमोठीं कामें चालू पिढीच्या जवळून पैसा घेऊन करणें ह्मणजेच अन्यायाचें आहे. कारण, पुढल्या पिढ्यांकरितां हल्लींच्या पिढीवर अशानें विनाकारण जबर बोजा बसविल्यासारखें होतें. येथपर्यंत राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीच्या स्वीकाराच्या कारणांचा विचार झाला. आतां या कर्जाच्या पद्धतीनें देशांतील धंद्यांवर काय परिणाम होतात, व्यक्तिमात्राच्या उत्पन्नावर तिचा काय परिणाम होतो, याबद्दलच्या साधकबाधक प्रमाणांचा विचार करावयास पाहिजे; तसेंच देशांतल्या देशांत काढलेल्या कर्जाचा काय परिणाम होतो व परदेशांत कर्ज काढल्यापासून काय परिणाम होतो याचाही विचार केला पाहिजे. सुधारलेल्या राष्ट्रांतल्या सरकारांला कोणत्या कारणांमुळे कर्ज काढण्याचा प्रसंग येतो याचें विवेचन वर केलें आहे. आतां राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीच्या साधकबाधक प्रमाणांचा विचार करून देशाच्या सांपत्तिक स्थितीवर या पद्धतीनें काय परिणाम होतात व कराच्या पद्धतीनें किंवा कर्जाच्या पद्धतीनें पैसे उत्पन्न करण्यापासून कमीजास्त नफानुकसान काय होतें, हें आधुनिक अर्थशास्त्रदृष्ट्या ठरवावयाचें आहे. हें झालें म्हणजे हाती घेतलेल्या विषयाचा शास्त्रीय भाग आटपला म्हणावयाचा. मग पूर्वसंकल्पाप्रमाणें हिंदुस्थानच्या. कर्जाचा इतिहास देऊन, त्याचा देशाच्या उद्योगधंद्यांवर कसकसा परिणाम घडत आहे, एवढें पाहणें राहिलें. राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीपासून सर्वथा व सर्व प्रकारें फायदा असल्यामुळें देशास झालेलें कर्ज फेडण्याच्या भानगडीत मुत्सद्यांनीं कधीही पडूं नये, उलट गरज लागेल तव्हां नवीन कर्ज काढीत रहावें, असें एक मत आहे. या लोकांचें म्हणणें असें कीं, राष्ट्रीय कर्ज हें देशांत एक त-हेनें नवीन भांडवल उत्पन्न करतें; ह्मणजे व्यापारांत असलेल्या भांडवलाखेरीज हें निवळ पडून राहिलेल्या पैशापासून सरकारास कर्ज मिळतें व कर्जावर दिलें जाणारें व्याज हें कांही लोकांचें एक कायमचें उत्पन्न बनतें व या उत्पन्नानें नवीन