पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४६३]

अर्वाचीन काळीं सरकारास कर्ज काढण्याची पाळी आणणारें दुसरें कारण म्हणजे लष्करी खातें व प्रत्यक्ष युद्ध करण्याचा प्रसंग होय. प्राचीन काळीं राजास लष्करी खात्याचा खर्च मुळींच नसे. कारण त्या काळीं देशांतील प्रत्येक पुरुष हा शिपाईच असे. लष्करी ज्ञान आत्मसंरक्षणाकरितां प्रत्येकास सहजच मिळे. यामुळें स्वतंत्र पगारी सैन्य ठेवण्याचें कारण नसे. राजानें युद्धास तयार राहण्याची द्वाही फिरविली कीं सर्व लोक तयार असत. शिवाय त्या काळीं लढाई शेतकीचें काम संपल्यानंतर सुरू होऊन बरसातीचे सुमारास संपविण्याची पद्धत असल्यामुळे प्रत्येक मनुष्यास आपला शेतकीचा धंदा संभाळून सैन्यांत सामील हाऊन देशाकरितां व राष्ट्राकरितां लढाईला जाण्यास सवड असे व यामुळे त्यास वेतन देण्याचें कारण नसे. लढाईकरितां अन्नसामग्रीची तजवीज केली म्हणजे झालें. तसेंच लढाई करण्याचीं हत्यारें तलवार, तीरकमटा, कुऱ्हाड वगैरे प्रकारचीं साधीं व सोपीं असल्यामुळें त्याकरितांही सरकारास फार खर्च नसे; परंतु कवायती पलटणें, तोफा, बंदुका, दारूगोळा वगैरे गोष्टींचा लढाईच्या पद्धतींत समावेश झाल्यापासून पूर्वीच्या सर्व गोष्टी पालटल्या. आतां लष्करी शिक्षण फार महत्वाचें झालें व त्यामुळें श्रमविभागाचें तत्त्व अंमलांत आणणें भाग पडलें. आतां शांततेच्या दिवसांत लढाईच्या वेळीं उपयोगी पडणारीं मोठमोठीं सैन्यें जय्यतं तयार ठेवणें प्रत्येक राष्ट्रास भाग पडूं लागले. दारूगोळ्याच्या शोधामुळें लढाईचें काम अत्यंत खर्चाचें झालें इतकेंच नाही, तर पूर्वीच्या एकंदर पद्धतींत सर्व प्रकारें क्रांति झाली. आतां व्यक्तिची शक्ति, बळ व धैर्य यांपेक्षां बुद्धि, कौशल्य व शिस्त यांचें महत्व जास्त झालें. ज्या देशाजवळ मुबलक पैसा व ज्या देशाच्या सैन्यांत नवीन प्रकारचें लष्करी शिक्षण व अगदीं अर्वाचीन त-हेचीं हत्यारें आहेत, त्या देशाला अर्वाचीन काळीं लढाईत जय मिळण्याचा संभव आहे व म्हणूनच व्यापारी राष्ट्रापुढें नुसत्या शूर परंतु रानटी लोकांचा हल्लींच्या काळीं टिकाव निघणें शक्य नाहीं. हल्ली लढायांचा खच किती वाढला आहे, हें अलीकडच्या दोन युद्धांवरून सहज दिसून येईल. ब्रिटिश साम्राज्यासारख्या बलाढ्य साम्राज्याच्या सरकाराला पांच सात जिल्ह्यांएवढा विस्तार नाहीं अशा दोन यःकश्चित बोअर संस्थानांना जिंकण्यास २५ कोटी पौंड खर्च आला. म्हणजे इंग्लंडाच्या आजपर्यंतच्या जमलेल्या सर्व राष्ट्रीय