पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/475

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४५९]

परवानगीवांचून कर वसूल करण्याचें धाडस केल्याबद्दल व इंग्रजी साम्राज्यपद्धतीच्याविरुद्ध वर्तन केल्याबद्दलच इंग्लंडच्या पहिल्या चार्लस राजास आपल्या प्राणास मुकावें लागलें हें महशूरच आहे. तेव्हांपासून इंग्लंडच्या राजांचा अधिकार फारच मर्यादित झाला व बहुतेक सर्व बाबतींत पार्लमेंटच्या सल्ल्या खेरीज राजास वागतां येईनासें झालें; इतकेंच नव्हे, तर पुढें पार्लमेंटामध्यें ज्या पक्षाचें बहुमत असेल त्या पक्षतूनच आपले प्रधानसुद्धां निवडावे लागले. कराचे पैसे वसूल होण्यास विलंब लागल्यास राजाचे प्रधान पार्लमेंटजवळ तात्पुरतें कर्ज काढण्यास परवानगी मागत व पुढें पुढें तें कर्ज कायमच करावें लागे. कारण, आणखी नवीन खर्च उत्पन्न होतच असत. इंग्लंडाचें राष्ट्रीय कर्ज दुसरा चार्लस याचे वेळेपासून सुरू झालें आहे. पूर्वी सुरक्षितपणाकरितां लोक आपलें जडजवाहीर लंडन येथील सरकारी किल्ल्यांत ठेवीत असत. दुस-या चार्लस राजाला पैशाची फार जरूर लागल्यामुळे त्यानें त्या किल्ल्यांतील जडजवाहीर घेऊन त्याचा विनियोग करून टाकला. याप्रमाणें चार्लस राजानें दांडगाईनें व बळजबरीनें लोकांचे पैसे घेतले. यामुळे लोक आपली शिल्लक सरकारी किल्ल्यांत न ठेवतां लंडनमधल्या सराफांजवळ ठेवू लागले व त्यांच्याच पुढें मोठमोठ्या पेढ्या झाल्या. सरकारला झालेलें कर्ज एकच करण्याकरितां व सरकारास वेळोवेळीं लागणारें कर्ज जास्त सुलभतेनें काढतां यावें म्हणून बँक ऑफ इंग्लंड नांवाची एक नवीन पेढी तिसरा वुइल्यम राजा याच्या कारकीर्दीत स्थापन झाली. या पेढीनें सरकारचें पूर्वीचें सर्व कर्ज फेडून तें आपल्याकडे घेतलें व नवें लागणारें कर्ज उभारून देण्याची हमी घेतली. याबद्दल त्या बँकेला सरकारनें विशेष प्रकारच्या सवलती दिल्या. चार्लस राजानें जुलुमानें व बळजबरीनें घेतलेल्या लोकांना या बँकेचे शेअर दिले व त्यांना नियमित रीतीनें व्याज मिळेल अशी तजवीज केली. जसजसा इंग्लंडचा राज्यविस्तार वाढत चालला तसतसा राज्याचा खर्च वाढत चालला. व लढाया वगैरे विशेष कारणांचा खर्च कर्जानें भागविणें सोयीचें असल्यामुळे इंग्लंडचें राष्ट्रीय कर्ज इंग्लंडच्या राज्यविस्ताराप्रमाणेंच अवाढव्य होत गेले. परंतु या राज्यविस्ताराबरोबरच इंग्लंडच्या व्यापारधंद्याची वाद होत जाऊन इंग्लंडास व्यापारी बाबतींत वर्चस्व मिळल्यामुळें इतक्या मोठ्या राष्ट्रीय कर्जाचें जड जूं इंग्लंडसारख्या धनाढ्य