पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/473

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४५७]

फारशी वाढ होऊं शकत नाहीं व देशांत संपत्तिही मुबलक नसते. प्रसंगीं उपयोगी पडण्याकरितां मनुष्याच्या स्वाभाविक दूरदर्शींपणानें जितका लोक पैसा शिल्लक टाकितात तितका ते पुरून ठेवितात किंवा दुस-याच्या नजरेस न येईल अशा त-हेनें आपल्या संग्रहीं ठेवितात. परंतु देशांतील सरकारास बरेंच स्थैर्य आलें, सरकारनें देशांतील बंडफितूर मोडून जीवितास व मालमत्तेस सुरक्षितता आणली, न्यायाचीं कोर्टे स्थापून व्यक्तींचे व्यवहार सुरळीत चालतील अशा प्रकारची व्यवस्था केली व देशाच्या व्यापारधंद्याला उत्तेजन दिलें म्हणजे देशांत बरेच संपन्न लोक दृष्टीस पडूं लागतात. पुष्कळ लोकांजवळ आपल्या धंद्यास पुरून उरे इतका पैसा असतो. साधारण सुखवस्तु लोकांनाही आपली थोडीशी पुंजी घरांत निरुपयोगी पडन न राहतां व्याजानें लागेल तर चांगलें असें वाटू लागतें. अशी देशांतील स्थिति राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीच्या उत्पत्तीला अनुकूल स्थिति होय. कारण अशा लोकांच्या मनःस्थितींत सरकारला जर पैशाची जरुर लागली व करानें पैसा वसूल करण्यास विलंब लागणार व तेवढी तर अवधि नाहीं म्हणून व्याजानें कर्जाऊ पैसे घेण्याचा सरकारनें विचार केला तर लोक सरकारास कर्ज देण्यास एका पायावर तयार असतात. कारण सरकारसारखा शहाजोग कर्जदार दुसरा कोण मिळणार आहे ? सरकाराच्या स्थैर्यामुळें व सरकारच्या न्यायपद्धतीनें सरकारवर लोकांचा विश्वास बसतो व 'आपला शिल्लक पैसा नुसता पुरून किंवा पेटींत न ठेवतां थोड्या व्याजानें सरकारास तो कर्जाऊ देण्यांत लोकांचें नुकसान न होतां उलट फायदाच होत असतो; अशा वेळीं सरकारासही थोड्या व्याजावर पैसे मिळतात. कारण देशांतील सर्व सुखवस्तु लोकांची सरकारास कर्ज देण्यांत चढाओढ असते.
  युरोपखंडांत ही राष्ट्रीय कर्जाची पद्धति प्रथमतः इटली देशांतील व्हेनिस, जिनोआ, फ्लॉरेन्स वगैरे संस्थानांत सुरू झाली. कारण वर निर्दिष्ट केलेली अनुकूल परिस्थिति या संस्थानांना फार लवकर प्राप्त झाली. केप ऑफ गुड होपला वळसा घालून जलमार्गानें हिंदुस्थानांत जाण्याचा मार्ग वास्कोदिगामा यानें शोधून काढण्यापूर्वी इटलींतलीं बंदरें व शहरें युरोप व एशिया यांमधील दळणवळणाचीं व व्यापाराचीं नाकीं होतीं व त्या काळीं युरोपपेक्षां हिंदुस्थानांत व चीन वगैरे एशियांतील देशांची