पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/470

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४५४] नसे खरी, तरी राजकीय जमाखर्चाचें तोंड मिळविण्याचें तत्व त्या काळच्या फडणिसांना व मुत्सद्यांना ठाऊक होतें असें दिसतें; इतकेंच नव्हे, तर ज्या ' राष्ट्रीय कर्जच्या ' युरोपीय पद्धतीचा साद्यत इतिहास देण्याचें आम्हीं योजिलें आहे, त्या तत्वाचा बीजरुपानें पेशवाईत प्रारंभ झाला होता याला सबळ पुरावा आहे व म्हणूनच आम्ही पेशवाईतील जमाखर्चाच्या पद्धतीचा प्रारंभीं उलेख केला आहे. महाराष्ट्राची त्या वेळची स्थिति, या राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीच्या वाढीला अनुकूल नव्हती म्हणून त्या पद्धतीचा प्रसार झाला नाहीं इतकेंच. पुढें मराठेशाही मोडकळीस येऊं लागून शेवटीं रावबाजीच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचीं सर्व सूत्रे इंग्रजांच्या ताब्यांत आलीं व त्यांची राष्ट्रीय कर्जाची पद्धत सुरू झाली, हा इतिहास सर्वांना श्रुत आहेच. मराठेशाहींतील पहिल्या तीन चार पेशव्यांचा सर्व वेळ लढाया करण्यांत व नवीन मुलूख काबीज करण्यांत गेला; परंतु लढाया करण्यास नेहमींचा जमारबंदी वसूल पुरा पडत नसल्यामुळे पेशव्यांना कर्ज करणें अवश्य होई. पहिल्या बाजीरावास ५० लाखांचेवर कर्ज झालें होतें असें सांगतात. सावकारांचे तगादे त्याचेमागे नेहमीं लागलले असत. हें कर्ज त्यानें आपल्या खासगी पतीवर काढलेलें असे. नानासाहेबांसही असेंच पुष्कळ कर्ज होतें. थोरले माधवराव यांचा आपण आपलें कर्ज फेडिलें नाहीं अशा हृद्रोगानें मरणकाळी जीव घुटमळत होता व जवळच्या मुत्सद्यांनी कजाच्या फडाबद्दल आपण काळजी करूं नये, आम्ही आपणास कर्जात ठेवणार नाहीं, आपल्या सर्व कर्जाचा आपल्या पश्चात निकाल लावू, असें आश्वासन दिल्यावर थोरल्या माधवरावांनीं सुखानें प्राण सोडला, असें जुन्या कागदपत्रांवरून कळतें. हीं सर्व कर्ज खरोखर राज्याकरितां व राष्ट्रीय लढाया चालविण्यासाठीं असत खरीं, परंतु ती प्रत्येक पेशवा आपल्या स्वतःच्या पतीवर व हिंमतीवरच काढीत असे. अजून त्याला राष्ट्रीय कर्जाचें पूर्ण स्वरूप आलें नव्हतें, व एका पेशव्याच्या कर्जाबद्दल दुसरा पेशवा कायदेशीर रीतनें जबाबदार नसे. तरी पण हें कर्ज राष्ट्रीय आहे असेंच समजत असत; इतकेच नव्हे, तर युरोपांतल्याप्रमाणें कर्जाच्या राष्ट्रीयत्वाची मोठी खून जी कर्ज फेडीकरितां सर्व लोकांवर कर बसवावयाचा अधिकार तोही केव्हा केव्हा पेशव्यांनी अंमलात आणलेला आहे असें दिसतें. कर्जपट्टी म्हणून