पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/466

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ 8५० ] खंडानें घेणार नाहींत. अशा परिस्थितींत जमिनीवरील कर जमीनदारांवरच कायद्याच्या उद्देशाप्रमाणें पडेल व तो खरोखरी प्रत्यक्ष करच राहील. परंतु जमीनदार थोडे व एकवटलेले, व कुळे अनन्यगतिक, गरीब व एकमेकांशीं चढाओढ करणारीं अशीं असलीं म्हणजे या जमिनीवरलि कराचा संपात कुळांवर पडेल. अर्थात या कराला अप्रत्यक्ष कराचें स्वरूप प्राप्त होईल. तसेंच घरावरील घरपट्टी व जमीनपट्टी हेही प्रत्यक्ष कर आहेत व ते मालकावर पडतील. परंतु घरें थोडा व गरजवंत बिऱ्हाडकरू पुष्कळ अशी स्थिति असल्यास हा कर बि-हाडकरांवर ढकलला जाईल व बि-हाडकरांना जास्त भाडें देण्याचें सामर्थ्य नसल्यास त्यांना पूर्वीपेक्षां कमी सोयीचें घर घ्यावें लागेल. परंतु घरवाले पुष्कळ असले व त्यांना भाडेक-याची गरज असली म्हणजे हा कर घरवाल्यावरच पडेल. अर्थात त्याचा संपात कायद्याच्या हेतूप्रमाणें राहील. वरील दोन्ही तिन्ही उदाहरणांवरून कराच्या संपाताची मीमांसा ध्यानांत येईल. जेथें जेथें कर देणाराची मक्तेवाल्यासारखी स्थिती असेल तेथें तेथें त्याला कर दुस-यावर टाकतां येईल. परंतु हा कर दुस-यावर टाकण्यानें जर त्या वस्तूच्या मागणींत फरक होईल तर मग तो सर्वांशी दुसयावर टाकतां येणार नाहीं. प्राप्तीवरील कर सर्व प्रकारच्या प्राप्तीवर सररहा असला म्हणजे तो कर कर देणारावरच पडतो. तो दुस-यावर ढकलणें शक्य नसतें. यामुळे हा कर प्रत्यक्ष करापैकींच राहतो. या कराच्या या स्थिर संपातामुळे सर्व सुधारलेल्या देशांत हा कर कायम ठेवण्याकडे प्रवृत्ति आहे. हा कर समतेच्या दृष्टीनें चांगला आहे व जरी ती कराच्या इतर तत्वांच्या दृष्टीनें तितका चांगला नाहीं तरी पण तो सर्वांवर त्यांच्या ऐपतीच्या मानानें पडत असल्यामुळे हा कर एक चांगल्या करांपैकीं समजला जातो. बाकी हा कर निश्चित नसतो. या कराची आकारणी करण्यांत सरकारी अंमलदारास लाचलुचपतीला अवसर सांपडतो. आपल्यावर पुढल्या वर्षी किती कर बसेल याचा मनुष्यास अंदाज करतां येत नाहीं. तसेंच, हा कर अप्रत्यक्ष करांपेक्षां वसूल करण्यास व लोकांस देण्यास जास्त अवघड आहे. असे या करावर बरेच आक्षेप आहेत. तरी समतेच्या दृष्टीनें हा कर पुष्कळ वरच्या पायरीचा आहे. जुन्या व जुलुमी पद्धतींत सुरू असलेल डोईपट्टीसारखे कर हे प्रत्यक्ष