पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग सहावा. कराची संपात-मीमांसा. मागील भागांत करांच्या प्रसिद्ध तत्वांचा विचार झाला. एखाद्या देशांतील प्रजाजनांवर कराचा बोजा त्यांच्या ऐपतीप्रमाणें पडावा हें समतातत्वाचें रहस्य आहे. आतां ही समता कोणत्या गुणांत समजावयाची याबद्दल वाद असेल. परंतु कराचा बोजा अगर संपात देशांतील एका वर्गावर अत्यंत तर एका वर्गावर फारच कमी अगर मुळींच नाहीं, असा नसावा हें उघडच आहे. कारण संपात अशा त-हेचा असला तर ती अगदीं अन्यायाचा होईल; तो समतेच्या तत्वाविरुद्ध होईल-मग त्या समता तत्वाचा अर्थ कांहींही करा-हेंही उघड आहे. फ्रान्सच्या प्रसिद्ध राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्सच्या कराच्या पद्धतींत हाच मोठा दोष होता. कराचा बहुतेक सर्व भार शेतकरीवर्गावर पडे. हा वर्ग आधींच गरीब होता व त्यावरच कराचा संपात विशेष होता; व सरकारी अंमलदार, सरदार लोक, बडबडे धर्मोपदेशक, वगेरे श्रीमंत वर्ग करापासून बहुतेक मुक्त होते. ही अन्यायाची कराची पद्धति व त्यानें उत्पन्न झालेला असंतोष हे एक फ्रान्समधील राजक्रांतीचें महत्वाचें कारण होतें, असें इतिहासकार सांगतात, यावरून या कराची संपातमीमांसा किती महत्वाची होती हे दिसून येईल. परंतु ही मीमांसा जितकी महत्वाची आहे तितकीच ती कठीण. भानगडीची व घोटाळ्याची व म्हणून दुर्ज्ञेय आहे. कारण या मीमांसेमध्यें प्रत्येक कर शेवटीं समाजांतील कोणत्या व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर पडतो हें पहावयाचें आहे. परंतु समाजांतील व्यवहार व त्याचे परस्परांवर होणारे परिणाम इतके विविध असतात कीं, एका कराचा परिणाम काय होतो व शेवटीं तो कोण भरतो हें सांगणें कठीण हेातें. ‘ एका पाण्याच्या थेंबाचा प्रवास' या गोष्टीप्रमाणेंच 'कराच्या एका रुपयाचा प्रवास ? याची ही मजेदार गोष्ट होईल. परंतु ठोकळ त-हेनें तरी करांचा हा