पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

232 पुष्कळ खर्च फी किंवा विशेष पट्टी यांतून भागवितां येतील. त्याकरितां सर्वसामान्य कर बसविण्याचें कारण नाहीं. परंतु अर्वाचीन काळीं एकंदर सामान्य कर बसविण्याकडे सरकारची प्रवृत्ति जास्त आहे. तरी पण कांहीं कांहीं उत्पन्नाच्या बाबी फीच्या वर्गांत येतात. दिवाणी कोर्टाचा पुष्कळ खर्च वादीप्रतिवादीकडून फीच्या रूपानें घेतला जातो. तसेंच कागद रजिष्टर करण्याची फी, वारसाच्या सरतीफिकिटाची फी, शिक्षणाकरितां घेतली जाणारी विद्यार्थ्यांची फी, वगैरे तऱ्हेच्या बाबी या वर्गात मोडतात. या उत्पन्नाच्या प्रकाराचा हा विशेष आहे कीं, ही फी सरकार जें काम करतें त्याच्या मोबदल्यावजा असते. म्हणून तें काम करण्यास जितका खर्च येतो तितकीच किंवा केव्हां त्यापेक्षां कमी फी ठेवण्यांत येते व या दृष्टीनें ही बाब करापासून भिन्न आहे.

     उत्पन्नाची तिसरी बाब ही किंमतीची होय. सरकार कांहीं संपत्ति उत्पन्न करीत असेल व इतर खासगी व्यक्ति ज्याप्रमाणें आपला माल विकून उत्पन्न अगर नफा मिळवितात, त्याप्रमाणे सरकार खासगी व्यक्तींप्रमाणेंच संपत्ती गि-हाइकांना विकून त्यापासून उत्पन्न काढीत असेल. सरकार कांहीं कारखाने प्रत्यक्ष चालवीत असेल; तसेंच सरकार जमिनीचे मालक असेल व त्याबद्दल त्याला भांडें मिळत असेल; किंवा सरकारच्या मालकीचें जंगल असेल व त्याच्या विक्रीपासून सरकारला सालोसाल उत्पन्न मिळत असेल; तसेंच सरकार पाटबंधाऱ्याचीं कामें करून लोकांना पाणी देऊन त्यापासून उत्पन्न काढीत असेल; सरकारच्या मालकीच्या रेल्वे असतील व त्यांपासून सरकारला उत्पन्न होत असेल. सारांश, सरकार मालक अगर कारखानदार या नात्यानें जें उत्पन्न मिळवीत असेल तें सर्व या सदरांत येतें.
     पूर्वकाळीं या सदराला महत्व असे. युरोपांतील जहागिरीपद्धतीच्या काळीं राजाला कराची गरजच नसे. कारण त्याचा खर्च स्वतःच्या मालकीच्या जमिनीच्या खंडांतून भागे. शिवाय दुस-याही सदरापासून राजाला उत्पन्न मिळे. परंतु सुधारलेल्या सर्व राष्ट्रांमध्यें दुसरे दोन्ही वर्ग कमी महत्त्वाचे झाले आहेत व सरकारची  मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे करच होय.तरी आतां या,करांच्या निरनिराळ्या प्रकारांकडे वळूं