पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भाग चवथा.

                     सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी. 
      अर्वाचीन काळीं सुधारलेल्या सरकारच्या उत्पन्नाच्या बाबींचे तीन वर्ग करतां येतील. पहिला व प्रमुख वर्ग करांचा होय; दुसरा फीचा होय; तिसरा किंमतीचा किंवा संपत्तीच्या विक्रीचा होय. सरकारच्या कर्तव्यकर्माच्या अंमलबजावणीस लागणा-या खर्चाकरितां-हीं कर्तव्यकर्में प्रजेच्या फायद्याचींच असतात-सरकारी अधिकारानें व्यक्तीकडून अगर व्यक्तिसमूहाकडून त्यांच्या संपत्तीपैकीं सक्तीनें घेतलेला हिस्सा अगर भाग म्हणजे कर होय. प्राप्तीवरील कर, जमिनीवरील कर, मिठावरील कर, आयात मालावरील जकात, वगैरे प्रकारच्या सर्व उत्पन्नाच्या बाबी कर या सदरांत मोडतात.या सर्वांमध्यें सरकारी कर्तव्यकर्माच्या अंमलबजावणीकरितां लागणा-या खर्चाकरितां सक्तीनें व्यक्तीच्या संपत्तींतून एक भाग घेणें हा सामान्य गुण आहे. मग उत्पन्न काढण्याची तऱ्हा कोणतीही असो. प्राप्तीवरील कर हा ठरलेल्या प्राप्तीवरच्या प्रत्येक माणसाकडून रोख घेतला जातो. जमिनीवरील कर असाच जमिनदारांकडून रोख घेतला जातो. पूर्वकाळीं डोईपट्टी म्हैसपट्टी अशा प्रकारचे कर असत ते असेच सक्तीनें घेतले जात असत. निरनिराळ्या आयात अगर निर्यात मालावर बसविलेल्या जकाती याही व्यापायांकडून सक्तीनें वसूल केल्या जातात. परंतु या कराच्या निरनिराळ्या प्रकाराचा विचार पुढें येणारच आहे.
      सरकारच्या उत्पन्नाची दुसरी बाब फीची होय. मागील भागांत सांगितलेंच आहे कीं, सरकारचीं कांहीं कर्तव्यकर्में विशिष्ट व्यक्तींना फायद्याचीं असतात. तेव्हां अशा कर्तव्यकर्मांच्या बजावणीस लागणारा खर्च त्या व्यक्तींकडून घेण्यांत यावा हें वाजवी आहे. अॅडाम स्मिथनें हें विशिष्ट व्यक्तिहिताचें तत्व पुष्कळ गोष्टींना लागू केलें आहे व अशा गेष्टीचा खर्च त्या त्या लोकांकडून घ्यावा असें त्याचें म्ह्णणें होतें. त्याचें म्हणणें सर्व न्यायखात्याचा खर्च, रस्तेसडका यांचा खर्च, शिक्षणाचा खर्च, वगैरे