पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग तिसरा सरकारचीं कर्तव्यकर्में. मागील भागांत अॅडाम स्मिथच्या मताप्रमाणें सरकारचीं कर्तव्यकर्में कोणती व तीं पूर्ण करण्यास समाजाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्यें किती व कसा खर्च लागतो याचा विचार केला. अॅडाम स्मिथच्या काळीं सरकारच्या कर्तव्यकर्माची कल्पना फार संकुचित होती-फार कोती होती-असें नेहेमीं म्हणण्यांत येतें. परंतु मागील भागांतील विवेचनावरून ती कल्पना बरीच लवचिक आहे व हल्लींच्या काळीं सुधारलेलें सरकार ज्या ज्या गोष्टी हातांत घेतें त्या त्या सर्वांचा अन्तर्भाव अॅडम स्मिथच्या कर्तव्यचतुष्टयांत करतां येईल हें सहज दिसून येईल. सरकारनें व्यापाराच्या कामांत ढवळाढवळ न करितां खुल्या व्यापाराचें तत्व स्वीकारावें असें जें अॅडाम स्मिथनें मत प्रतिपादन केलें त्यावरून हा समज झालेला आहे. शिवाय त्याच्या सृष्टिविषयक एका धर्मकल्पनेमुळेंही असा समज झालेला आहे. त्याचे मतानें ईश्वरानें सृष्टीची व मानवी स्वभावाची अशीच रचना केली आहे कीं, प्रत्येक मनुष्याला आपलें हिताहित कळतें व स्वहित व परहित यांमध्यें कधीं विरोध नसतो. परंतु असा विरोध जेथें असेल किंवा निदान व्यक्तींना सार्वजनिक काम करण्यास जेथें स्वहिताचा मोठा पाठिंबा नसेल तेथें सरकारनें हात घालणें अवश्य आहे, असें अॅडाम स्मिथनें प्रतिपादन केलें आहे व सुधारलेल्या देशांत सरकार ज्या ज्या गोष्टी हल्लीं हाती घेतें त्याचें त्याचें समर्थन या मुद्यांवर करतां येईल. परंतु अर्वाचीन काळीं सरकारच्या कर्तव्यकर्माचें वर्गीकरण नेिराळ्या पद्धतींवर केलें जातें. अॅडाम स्मिथच्या विवेचनाला कर्तव्यकर्माचें वर्गीकरण म्हणण्यांपेक्षां- ज्याला तर्कशास्त्रांत व्यक्तिगणन म्हणतात तसलें- व्यक्तिगणन म्हणणें जास्त सयुक्तिक होईल. वर्गीकरणामध्यें वस्तुसमुदायाचे गुणागमावरून पोटभेद पाडले जातात. तसा प्रयत्न अॅडाम २८