पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४३० ] गेष्टींचा उल्लेख मागील एका पुस्तकांत केला आहे. तेव्हां येथें त्याची पुनरावृत्ति करण्याचें प्रयोजन नाहीं. सरकारच्या तिसऱ्या कर्तव्यापैकीं बाकी राहिलेल्या भागांत शिक्षणसंस्थांचा खर्च व धार्मिक संस्थांचा खर्च येते. तरुणांना शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणजे शाळा, कॉलेजें व युनिव्हर्सिट्या होत, या संस्था खासगी व्यक्तींकडून चालणें शक्य नसल्यामुळे त्या सरकारनें हाती घेतल्या पाहिजेत असें अॅडाम स्मिथचें म्हणणें आहे. मात्र या संस्थांचा चालू खर्च या संस्थांचा फायदा घेणाऱ्या व्यक्तींकडून फीच्या रूपानें घेणें इष्ट आहे असें अॅडाम स्मिथचें मत आहे व यापैकीं पुष्कळ संस्था खासगी व्यक्तीच्या मोठमोठ्या देणग्यांच्या व्याजांतून व उत्पन्नांतून चाललेल्या आहेत. तेव्हां या बाबतींत सरकारला फारसा पैसा खर्च करण्याचें कारण नाहीं. हें अॅडाम स्मिथचें मत इंग्लंडच्या अनुभवावरून झालेलें होतें. परंतु हल्लींच्या काळी यासंबंधीं सुधारलेल्या देशाच्या मतांत फार अंतर पडलेलें आहे. सर्व प्रकारच्या शिक्षणाला सरकारनें आपल्या सामान्य उत्पन्नांतून पुष्कळच मदत केली पाहिजे व फीचें उत्पन्न हा एक या खर्चापैकी गौण भाग समजला पाहिजे म्हणजे शिक्षण होतां होईल तितकें स्वस्त केलें पाहजे व प्राथमिक शिक्षण तर मोफतच केलें पाहिजे असें सुधारलेल्या राष्ट्रामध्यें लोकमत आहे. अॅडाम स्मिथचें या बाबतींतील मत आतां अग्राह्य ठरलेलें आहे. याच भागांत त्यानें आपल्या वेळच्या उच्च शिक्षणाचा उदय व वाढ कशी झाली वगैरेबद्दलचा सुंदर इतिहास दिला आहे. परंतु त्याचें येथें सविस्तर विवेचन करण्याचें प्रयोजन नाहीं. तरी पण सामान्य लोकांना सामान्य शिक्षण देण्याची व्यवस्था करणें हें अत्यंत आवश्यक आहे; कारण या मुलांच्या आईबापांना सुखवस्तु लोकांप्रमाणें शिक्षणाची किंमत कळत नाहीं. हें मत अॅडाम स्मिथनें स्पष्टपणं सांगितलें आहे व याकरितां सरकारणे प्रत्येक खेडेगावांत प्राथमिक शिक्षणाची शाळा स्थापून लोकांना आपली मुलें शाळेंत पाठविण्यास उत्तेजन द्यावें व मुलांना शिक्षणाची गोडी लागण्याकरिता शिकलेल्या मुलांना काहीं एक मनाचें चिन्ह द्यावें किंवा अप्रत्यक्ष रीतीनें सरकारनें सक्तिही करावी. कोणत्याही माणसानें स्वतंत्र धंदा करूं लागण्यापूर्वीं सामान्य शिक्षण मिळविल्याचा दाखला मिळविला पाहिजे असा सर्वसाधारण नियमही सरकारला करतां येईल. सारांश,