पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/444

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४२८] कारण दळणवळणाच्या साधनांनीं माल स्वस्त होतो व स्वस्त माल झाल्यानें जो पैसा उपभोक्त्याचा वांचतो, त्यांतला एक अंश ते जकातीच्या रूपानें देतात. चैनीच्या सुंदर गाड्या, जलद चालणाऱ्या टपालाच्या गाड्या यांवर जकात थोडी जास्त असावी म्हणजे सामान्य लोकांपेक्षां श्रीमंत लोकांकडून सरकारला जास्त मदत होते. हीं साधनें चालू ठेवण्यास जकातीरूपाची पद्धत न्यायाची आहे. इंग्लंडमध्यें कांहीं कालवे खासगी व्यक्तीच्या मालकीचे असत. व ते कालवे दुरुस्त ठेवणें हें त्यांच्या हिताचेंच असे. नाहीं तर कालव्यापासून येणारें उत्पन्न कमी होतें. अशा कामाची व्यवस्था खासगी लोकांकडे असणेच इष्ट आहे. परंतु रस्त्यावरील जकात मात्र खासगी व्यक्तींच्या हातीं नसाव्या. कारण या खासगी व्यक्ती रस्ते दुरुस्त ठेवणार नाहींत व तरीसुद्धां जकातीच्या उत्पन्नांत फारसा फेर होणार नाहीं. फ्रान्समध्यें रस्त्यांची व्यवस्था सरकारी अंमलदारांच्या हातीं असते व याचा खर्च सरकारी तिजोरींतून होत असे. यामुळे ज्या रस्त्यांवरून राजा व सरदार मंडळी जाण्याचा संभव असे तेवढे रस्ते उत्तम तऱ्हेने ठेवलेले असत. परंतु बाकीच्यांची अगदीं हयगय होत असे. कांहीं लोकांचें असें म्हणणें आहे कीं, जकातींची पद्धति ही एक सरकारची उत्पन्नाची बाब करतां येईल. परंतु खालीं निर्दिष्ट केलेल्या कारणांकरितां असें करणें इष्ट नाहीं. १ जर जकाती उत्पन्नाची बाब केली तर राजाला या जकाती वाढविण्याचा केव्हांही मोह उत्पन्न होण्याचा संभव आहे. कारण याउपायानें वसुलाकारतां एक पैसाही खर्च न वाढवितां सरकारचें उत्पन्न वाढवितां येईल. परंतु या जकातीच्या वाढीचा अवश्यक परिणाम असा होईल कीं, मालाच्या किंमती वाढतील व त्यानें देशांतील व्यापाराचें नुकसान होईल. २ रस्त्यावरून वाहून नेलेल्या मालाच्या वजनाच्या प्रमाणानुरूप जकाती रस्याच्या दुरुस्तीच्या खर्चासंबंधीं न्याय्य व रास्त होतील; तरी पण कराच्या बाबी या नात्यानें जकाती या फार अन्यायाच्या होतील. त्यांच्यायोगानें गरिबांवर कराचें फाजील ओझें पडेल. कारण जाडा