पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/442

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४२६] व ज्या माणसामध्यें असे गुण असतात त्या माणसाचें वजन व छाप समाजावर बसल्याखेरीज राहत नाहीं. दुसऱ्या सर्व गोष्टी समान असतांना वय आदर व अधिकार उत्पन्न करतें. संपत्ति ही ताबेदारी उत्पन्न करणारी मोठी शक्ति आहे. गोपालवृत्तीमध्यें ज्या मनुष्याजवळ गुराढोरांचा मोठा कळप असतो त्या मनुष्याला आपल्या उत्पन्नाचा खर्च करण्याचा मार्ग म्हणजे पुष्कळसे आश्रित पदरीं बाळगणें हाच होय. हे आश्रित स्वाभाविक आपल्या यजमानाचा अधिकार मानतात. यामुळे अशा समाजांत श्रीमंत मनुष्य हा स्वाभाविकपणें पुष्कळांचा नायक व न्यायाधीशही होतो. जर आश्रितांमध्यें कांहीं तंटाभांडण झालें तर तें भांडण नाईक मिटवितो. तांबेदारीचें चवथें कारण जन्म होय. परंतु या वेळीं नागरिकांमध्यें आधीच असमता उत्पन्न झाली आहे असें तेथें गृहीत धरलें जातें. ज्या ठिकाणी मालमत्ता नाहीं तेथें वंशतत्वाला मुळींच महत्व नसतें. मृगयावृत्ति समाजांत वंशाला कांहींच किंमत नसते. परंतु एकदां एखादें घराणें श्रीमंत व मोठे झालें म्हणजे त्यांतील वंशजांना मान मिळतो. कारण त्या घराण्यालाच मान द्यावयाची लोकांना संवय झालेली असते. परंतु लोक एखाद्या उपटसुंभ मोठ्या माणसाची आज्ञा पाळावयास तयार नसतात; परंतु उच्च कुळांत जन्मलेल्याची ते आनंदानें आज्ञा पाळतात. तेव्हां वंश व संपत्ति हीं लोकांवर छाप व अधिकार बसविणारी महत्वाचीं कारणें होत. व यामुळेच एका घराण्यांत नायकत्व राहूं लागतें. असा नायक हा त्या टोळीचा स्वाभाविक न्यायाधीश होतो. परंतु त्या काळीं न्याय करणें हें काम राजाला खर्चाचें नसतें तर उलट ती एक उत्पन्नाची बाब असते. जो मनुष्य राजाकडे तंटा घेऊन येतो त्याला तंट्याचा निकाल करण्याच्या त्रासाबद्दल राजाला नजराणा द्यावा लागतो. पुढें पुढें राजाच या त्रासाबद्दल नजराणा हक्कानें मागतो. याप्रमाणें न्याय करणें ही राजाला एक उत्पन्नाची बाब होते. परंतु या पद्धतीपासून अनिष्ट परिणाम होतो. कारण ज्याच्याकडून जास्त मोठा नजराणा मिळेल त्याच्या बाजूचा निकाल मिळण्याचा संभव असतो. पुढें राजा हा आपला अधिकार बहुधा एका प्रतिनिधीच्या मार्फत चालवितो. हा न्यायाधीश आपण नजराणा घेऊन निकाल देऊं लागला म्हणजे पुढें राजाकडे दाद मागतां येते. परंतु येथेही नजराण्याच्या पद्धतीनें फार भ्रष्टकार होतो. कृषिवृत्तिसमाजांत