पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४२१ ] वर सांगितलें आहे की, सरकारचें कर्तव्यकर्म म्हणजे परचक्रापासून आपल्या प्रजेचें संरक्षण करणें हें होय. व हें करण्याकरितां सरकारला सैन्य व आरमार ठेवावें लागतें व समाजाच्या सुधारणेच्या पायरीप्रमाणें हें काम बिनखर्चाचें किंवा फार खर्चाचें असतें. मृगयावृत्ति व गोपालवृत्ति समाजांमध्यें प्रत्येक माणूस हा शिपाईच असतो व लढाईच्या वेळीं तो आपल्या नेहमींच्या नायकाबरोबर लढाईवर जातो. मृगयावृत्ति समाज हे नेहमीं अगर्दी लहान लहान टोळ्यांसारखे असतात. यामुळे या अवस्थेत फार लोक एकत्र जमू शकत नाहींत. परंतु गोपालवृत्ति समाज फार मोठा असू शकतो व यामुळे या स्थितीमध्यें हजारों लोकांचें सैन्य एका सेनापतीच्या हुकमतींत जमू शकतें. कारण या स्थितींत सर्व समाज नेहमीं फिरतच असतो. तेव्हां लढाईवर जाणें काय किंवा निवळ शांततेच्या हेतूनें दुसऱ्या कारणाकडे जाणें काय त्यांना एकच असतें. हेतूंत मात्र फरक इतकेच. यामुळे अशा स्थितींत सर्व समाजच्या समाज लढाईवर जाउं शकतो. टार्टर व आरब हीं गोपालवृत्ति राष्ट्रे होतीं व या लोकांमध्यें प्रचंड सैन्यें एकएकट्या नायकाच्या हाताखालीं जमलेल्याचें इतिहासावरुन दिसून येतें. समाजाच्या या दोन्ही स्थितींत सरकारला शिपायांस पगार देण्याचें प्रयोजन नसतें, कारण या युगांत युद्धावस्थेमुळे नागरिकांच्या नेहमींच्या व्यवसायांत व्यत्यय येण्याचें कारण नसतें. कृषिवृत्ति समाजांत लोकांची वस्ती स्थिरावलेली असते व पूर्वीच्या तंबूऐवजीं लोक घरांत राहतात. अशा स्थितींत लढाईवर जावयाचें झालें म्हणजे सर्व समाज घेऊन जाण्याची गरज नसते. म्हातरेकोतारे, बायकामुले ही घरची मालमत्ता संभाळण्याकरितां मागें राहतात. कृषिवृत्ति समाजांतील लोक नेहमीं उघड्या हवेंत काम करणारे असतात. शिवाय फुरसतीच्या वेळीं दांडपट्टा खेळणें, नेम मारणें, कसरत करणें वगैरे मदांनी खेळ खेळणें हें दोन्ही वृत्तींतील लोकांना सहज असतें यामळे कृषिवृत्ति समाजांतही शिपायाला विशेष शिक्षण लागत नाही. प्रत्येक शेतकरी हा स्वाभाविकच शिपाई असतो. या समाजाच्या अवस्थेमध्येंसुद्धां सरकारला सैन्याबद्दल खर्च पडत नाहीं किंवा शिपायांना पगार द्यावा लागत नाही. मात्र लढाई किंवा स्वारी हीं पिकाच्या हंगामानतर सुरू होऊन पेरे करण्याच्या वेळेच्या सुमारास संपली म्हणजे