पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/436

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४२०] अधिकारांची जरूरी आहे तितकेच अधिकार सरकारला असावे व तीच त्याची पराकाष्ठेची अधिकारमर्यादा असावी. सारांश, व्यक्तिक तत्वानें सरकारच्या कर्तव्याची कल्पना फार मर्यादित व संकुचित केलेली आहे. व हीच कल्पना अॅडाम स्मिथलाही ग्राह्य होती. परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत या फ्रान्समधील तत्वज्ञानाच्या अगदीं संकुचित कर्तव्यकल्पनेपेक्षां अॅडाम स्मिथची कल्पना जास्त विस्तृत आहे असें खालील विवेचनावरून दिसून येईल. या अॅडाम स्मिथच्या मताप्रमाणें देशांतील सरकारचीं कर्तव्यकर्में तीन प्रकारची आहेत. पहिलें व सर्वांत महत्त्वाचें कर्तव्यकर्म देशाचें परचक्रापासून संरक्षण करणें व देशांत शांतता राखून आंतील दंगेधोपेयांचा बंदोबस्त करणें हें होय. हें सरकारचे अगदीं पहिले कर्तव्यकर्म. दुसरें कर्तव्यकर्म म्हणजे व्यक्तीव्यक्तींमधील न्याय निवडणें व करारांची वगेरे अम्मलबजावणी होण्यास मदत करणें, हीं दोन कर्तव्यकर्में सरकारने उत्तम तन्हेनें बजाविलीं म्हणजेच देशांत जीविताला व मालमत्तेला पूर्ण सुरक्षितता येते व अशी सुरक्षितता ही एक संपत्तीच्या वाढीचें अमूर्तकारण आहे, याचें दुसऱ्या पुस्तकांत सविस्तर विवेचन केलें आहेच. यावरुन सरकारच्या या दोन कर्तव्यांचें अर्थशास्त्रदृष्ट्या फार महत्व आहे हें सहज दिसून येईल. सरकारचें तिसरें कर्तव्यकर्म ज्या सार्वजनिक संस्था व जीं सार्वजनिक कामें सर्व समाजाच्या उपयोगाचीं असली तरी जीं खासगी व्यक्तींकडून नफ्याच्या हेतूनें होण्यासारखीं नाहींत अशा संस्था व अशीं कामें सरकारनेंच आपल्या अंगावर घेतली पाहिजेत हें होय. हीं तीन कर्तव्यकर्म चांगल्या तऱ्हेनें पार पाडण्यास सरकारास उत्पन्नाची जरूरी असते. सरकारच्या खर्चाचे तीन कर्तव्यानुरूप तीन वर्ग होतात; परंतु सरकारच्या खर्चाची आणखी एक मोठी बाब असते. ती ही कीं, सरकारचा प्रतिनिधि जो वंशपरंपरागत राजा किंवा नेमलेला अधिकारी त्याचा खर्च राष्ट्राच्या इभ्रतीला व वैभवाला शोभण्यासारखा पाहिजे. तेव्हां सरकारच्या खर्चाचे चार भाग होतात. पहिला संरक्षणखात्याचा खर्च, दुसरा न्यायखात्याचा खर्च, तिसरा सार्वजनिक संस्था व कामें यांबद्दलचा खर्च व चवथा राजाचा खर्च. या खर्चाच्या बाबीही समाज निरनिराळ्या अवस्थांमध्यें कमी अधिक प्रमाणांवर असतात, तेव्हां आता प्रत्येक कर्तव्याचा वेगवेगळा विचार करणें इष्ट आहे.