पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/433

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४१७ ] सरकारच्या संपत्तीच्या स्वरूपांचा व त्यांच्या कारणांचा विचार होणें रास्त आहे. दुसरें जरी सरकारची संपात्ति देशांतील लोकांच्या संपत्तीपैकीच एक हिस्सा आहे असें मानलें तरी त्याचा निराळा व स्वतंत्र विचार अर्थशास्त्रांत करणें प्राप्तच आहे. या दृष्टीनें या पुस्तकांतील विषय हा संपत्तीच्या वांटणीचा एक पोटभाग होतो एवढेंच. देशांतील संपत्तीचे त्याच्या मूर्त कारणांच्या अनुरोधानें चार मुख्य हिस्से होतात असें मागें सांगितलें आहे. ते हिस्से म्हणजे भाडें, मजुरी, व्याज व नफा हे होत, व या प्रत्येकाचें स्वरुप व त्याचे नियम व तत्वें यांचा आपण वांटणी या पुस्तकांत विचार केला आहे. सुव्यवस्थित राज्यपद्धति हेंही एक संपत्तीच्या उत्पत्तीचें अमूर्त कारण आहे असें मागें सांगितलें आहे. तेव्हां संपत्तीच्या उत्पत्तींतून संपत्तीच्या याही कारणाचा हिस्सा निराळा पडतो व सरकारचे कर हा एक देशांतील संपत्तीच्या मुख्य वांट्यांपैकीं पांचवा वांटा आहे असें म्हटलें पाहिजे व यावरून कराच्या स्वरुपाबद्दल व त्याच्या नियमाबद्दल विवेचन अर्थशास्त्रांत कोठे तरी आलें पाहिजे हें उघड आहे.

सरकारी जमाखर्चाची चर्चा अर्थशास्त्रांत घालण्याविरुद्ध आणखी एक आक्षेप पुढें येण्याचा संभव आहे. तो हा कीं, जरी तात्विकदृष्ट्या हा विचार अर्थशास्त्रांत येऊं शकेल असें क्षणभर म्हटलें तरी ज्या अर्थीं राष्ट्रीय जमाखर्चाचें आतां एक स्वतंत्र शास्त्र झालें आहे व त्यावर स्वतंत्र ग्रंथ निर्माण झाले आहेत व यासंबंधाचें निराळेच वाड्मय तयार हात आहे त्या अर्थी हल्लींच्या काळीं तरी अर्थशास्त्रांत या विषयाचा ऊहापोह करण्याची जरूरी नाहीं. या आक्षेपाचें उत्तर अगदीं उघड आहे. ज्ञानाच्या प्रसाराबरोबर इतर धंद्यांप्रमाणें याही बाबतींत श्रमविभागाचें तत्व लागू होतें व जसजसें शाखांतील ज्ञान वाढत जातें तसतसें त्याच्या पोटशाखांचा स्वतंत्र तऱ्हेनें अभ्यास होऊं लागतो व त्याच शाखांवर मोठमोठे ग्रंथ होऊं लागतात. परंतु या शाखांना स्वतंत्रपणा येऊ शकत नाहीं. त्या मूळ वृक्षाच्या शाखाच राहतात. याचे एक दोन दाखले घेऊं. मानसशास्त्र हें एक निराळे शास्त्र आहे. मनुष्याच्या मनाचे व्यापाराचा ऊहापोह करणारें शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. व या शास्त्राची हट्टीं इतकी प्रगति झालेली आहे कीं, त्याच्या निरनिराळ्या अंगांवर स्वतंत्र ग्रंथ व मोठें वाङ्मय तयार होत आहे. म्हणून या अंगांचा मानसशास्त्रांत विचार होत नाही असें मात्र नाही. २७