पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४१६] एवढ्याच एका प्रश्नाचा विचार अर्थशास्त्रांत करतात. कांहीं अर्थशास्त्रकार तर या पुस्तकांतील सर्वच विषय अर्थशास्त्रांतून काढून टाकतात. कारण यांचे मतें राष्ट्रीय जमाखर्च हें एक स्वतंत्र शास्त्र झालेलें आहे व जरी या शास्त्राचा व अर्थशास्त्राचा निकट संबंध असला तरी राष्ट्रीय जमाखर्चाचा प्रश्न वास्तविक अर्थशास्त्राच्या व्याख्येंत येऊं शकत नाहीं. तेव्हां राष्ट्रीय जमाखर्चाचा प्रश्न अर्थशास्त्रांत घेण्याचें कारण नाही. अर्थशास्त्राचा जनक जो अॅडाम स्मिथ याच्या ग्रंथाकडे पाहिलें तर त्यानें आपल्या ग्रंथाचें एक सबंद पुस्तक- इतर सर्व पुस्तकापेक्षां मोठें पुस्तक- या विषयाला वाहिले आहे. तेव्हां या निरानिराळ्या प्रचारांतील कोणता प्रकार योग्य आहे व या ग्रंथांत कोणत्या प्रचाराचा अंगीकार केला आहे हें सांगणें इष्ट आहे. याचा निर्देश प्रास्ताविक पुस्तकाच्या शेवटल्या भागांत केला आहेच. अर्थशास्त्राच्या व्याख्येकडे जर नजर दिली तर या पुस्तकांतील विषय अर्थशास्त्रामध्यें येतो असें म्हणणें प्राप्त आहे. कारण अर्थशास्त्राचा विषय म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचें स्वरुप व तिच्या कारणांचा विचार हा होय. परंतु राष्ट्राचे अर्थात दोन भाग होतात; राष्ट्रांतील सरकार व लोक; तेव्हां या दोघांच्या संपत्तीचा विचार करणें अर्थशास्त्राचें काम आहे. परंतु यावर असा आक्षेप येईल कीं, सरकारची संपत्ति ही लोकांच्या संपत्तीचाच एक वांटा आहे. कारण सरकार हें निरनिराळ्या करांच्या रुपानें लोकांच्या संपत्तीचाच एक हिस्सा आपल्या खर्चाकरितां घेतें. तेव्हां सरकारची संपत्ति व लोकांची संपत्ति हें वर्गीकरणच मूळ चुकीचें आहे. यांत एकच संपत्ति दोनदा मोजली जाते. एकंदर संपत्तीच्या ऊहापोहांत सरकारच्या संपत्तीचा समावेश होतो. म्हणून अर्थशास्त्रामध्यें याचा निराळ्या भागांत विचार करण्याची जरुरी नाही. या आक्षेपाला दुहेरी उत्तर आहे. पाहिलें, सर्व ठिकाणीं, सर्व काळीं सरकारची संपत्ति लोकांच्या संपत्तीपासून कधींही निराळी नसते हें खरें नाहीं. सरकारच्या मालकीची स्वतंत्र जमीन असते; बहुतेक ठिकाणी देशांतील जंगल सरकारच्या मालकीचें समजतात; देशांतील खाणी केव्हां केव्हां सरकारच्या मालकीच्या असतात; केव्हां केव्हां सरकार कित्येक धनोत्पादक धंदे करतें व त्यापासून देशांत नवीनच संपत्ति उत्पन्न करते. तेव्हां राष्ट्रीय संपत्तीमध्यें या देशांतील