पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/430

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली पाहिजे. असें होण्याकरितां देशाच्या प्रथमावस्थेंत खुला व्यापार पाहिजे. त्यायोगानें लोकांच्या गरजा वाढतात, त्यांची अभिरुचि वाढते, त्यांना संपत्तीच्या पुष्कळ प्रकारचें ज्ञान होतें व या ज्ञानानें त्या मिळविण्याची इच्छा व वासना वाढते. अशी स्थिति उत्पन्न झाल्यावर मग संरक्षणपद्धतीचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे तो माल देशांत निघू लागतो व देशांतील कारखाने अगदीं प्रौढदशेप्रत पावले म्हणजे मग पुनः खुल्या व्यापाराचा अंगीकार केला पाहिजे. कारण नेहमींच संरक्षणपद्धति सुरू ठेविली तर देशांतील कारखान्यांना कोणाचीही चढाओढ राहत नाही. व चढाओढीच्या अभावीं कारखान्यांची प्रगमनशीलता नाहींशी होते. कांकीं सर्व प्रगति चढाओढीच्या व जीवनार्थकलहाच्या काळांत शक्य आहेत. येथपर्यंत खुला व्यापार व संरक्षण या दोन्ही पक्षांकडील प्रमाणें निष्पक्षपातानें पुढें मांडिलीं अहेत. दोन्ही पक्षांतील कांहीं कांहीं प्रमाणें लंगडीं आहेत असें तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु खुल्या व्यापाराच्या बाजूनें श्रमविभागाचें प्रमाण सयुक्तिक आहे. तसेंच चढाओढ ही सर्व सुधारणेचें मूळ आहे यांत शंका नाही. या दृष्टीनें होतां होईल तें व्यापार खुला असणें इष्ट आहे. तसेंच संरक्षणाच्या बाजूकडील चवथें व पांचवें प्रमाण या दोन्हींमध्यें पुष्कळ तथ्यांश आहे असें कबूल केलें पाहिजे. तसेंच खुल्या व्यापाराचें ध्येय विश्वबंधुत्व आहे· खुला व्यापार एकएका देशाचा फक्त विचार न करतां एकंदर जगांतील संपत्ति कोणत्या उपायानें वाढेल याकडे नजर फेंकतो. संरक्षणतत्वाचें ध्येय राष्ट्रीयत्व आहे. एका देशाची संपत्ति कोणत्या उपायानें वाढेल इकडे संरक्षणतत्व विशेष लक्ष देतें. जोंपर्यत सर्व जग एकछत्री झालें नाहीं व होण्याचा रंगही दिसत नाही, जोंपर्यंत देशादेशांमधील व राष्ट्राराष्ट्रांमधील हेवा, द्वेष, चढाओढ व स्पर्धा हीं कायम आहेत, तोंपर्यंत प्रत्येक देशानें आपल्या हिताकडे पाहणें अवश्य आहे व म्हणूनच आपल्या देशाची सांपत्तिक भरभराट होण्यास संरक्षणपद्धतीचा अवलंब करणें अवश्य आहे असें दिसून आल्यास तसें करण्याचा त्या देशाला अधिकार आहे. सारांश, खुल्या व्यापाराचें तत्व चांगलें किंवा संक्षरणतत्व चांगलें या प्रश्नाला तात्विक उत्तर येणार नाहीं. हा प्रश्न गणितशास्त्रासारखा तात्विक व सर्वत्र लागू पडणारा असा नाही.