पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४१३ ] जातें. रशियांत मजुरीचा दर फार कमी आहे. व इंग्लंडच्या महागऱ्या मजुरांनीं रशियांतील गरीब मजुरांना चिरडून टाकू नये म्हणून रशियांत संरक्षण पाहिजे असें संरक्षणवादी म्हणतात. याप्रमाणें संरक्षणवाद्यांचें हें प्रमाण परस्परविरोधी व म्हणूनच असंबद्ध आहे असें खुले व्यापारी म्हणतात. चवथें प्रमाणः- उद्योगबाल्यता- हेंच प्रमाण फार महत्वाचें आहे. व खुल्या व्यापाराचा प्रसिद्ध समर्थक जो मिल त्यानें या प्रमाणाचें सयुक्तिकत्व कबूल केल्यापासून त्याचें महत्व विशेष वाढलेलें आहे. जोंपर्यंत एका देशांतील धंदे बाल्यावस्थेंत आहेत तोंपर्यंत त्यांचा प्रौढावस्थेंतील परदेशाच्या धंद्यांशीं टिकाव लागणें अशक्य आहे म्हणून अशा स्थितींत संरक्षणपद्धतीचा अवलंब करणें अवश्य आहे. ज्याप्रमाणें मुलाच्या बालपणीं त्याला आईबापांच्या जोपासनेची जरूरी असते त्याप्रमाणेंच बालधंद्यांना सरकारच्या जोपासनेची जरुरी असते. अशा स्थितींत जर खुला व्यापार सुरू केला किंवा चालू राहिला तर या कोंवळ्या उद्योगाचा प्रौढ उद्योगाच्या चढाओढींत चुराडा होईल. याकरितां अशा स्थितींत देशानें संरक्षणपद्धतीचा अवश्य अवलंब केला पाहिजे. यावर खुल्या व्यापाराच्या समर्थकांचें म्हणणें असें आहे कीं, एकदां संरक्षणपद्धतीचा अवलंब केला म्हणजे उद्योगधंदे परावलंबी व पंगू होतात व त्यांची स्वयंकृत वाढ खुंटते. शिवाय ज्या ज्या धंद्यांना एकदां संरक्षण मिळतें त्या त्या लोकांचें तें संरक्षण कायम करण्यामध्यें हितच असतें व यामुळें खुल्या व्यापाराचें तत्व पुन: अमलांत येणें कठिण होतें. पांचवें प्रमाण:- उद्योगविविधता- प्रत्येक देशामध्यें उद्योगाची विविधता पाहिजे व प्रत्येक देशानें होतां होईल तों स्वयंपूर्ण व स्वावलंबी असलें पाहिजे. याकरितां संरक्षणाच्या साहाय्यानें पुष्कळ तऱ्हेचे धंदे देशांत निर्माण केले पाहिजेत. देशांमध्यें धंद्यांची विविधता असली म्हणजेच देश सर्व बाबतीत सुधारत जातो व त्याची वाढ एकदेशीय राहत नाहीं. देश जर आपलें सर्व लक्ष शेतकींत घालील तर तो देश नेहमीं परावलंबी राहील व त्या देशाची बौद्धिक, नैतिक वगैरे सर्वांगीण सुधारणा होणार नाहीं. प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्री लिस्ट यानें या शेवटच्या दोन प्रमाणांवर विशेष जोर दिलेला आहे. त्याचें मतानें ज्या ज्या देशांना उद्योगविविधता येण्याची शक्यता आहे- समशीतोष्णकटिबंधांतील बहुतेक सर्व देशांना अशी शक्यता आहे- त्या देशांनी अशी विविधता उत्पन्न