पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/428

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४१२] कीं खालावत आहे हा एक मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. व त्याचा विचार या ग्रंथाच्या सहाव्या पुस्तकांत करावयाचा आहे. सारांश, व्यापाराच्या समतोलनाचे प्रमाणाला हल्लीं मुळींच महत्व दिलें जात नाहीं. दुसरें प्रमाण-उद्योगवृद्धि-संरक्षणानें देशांतील कारखाने व शेतकी या दोहोंनाही उत्तेजन येतें. कारण देशांत कारखाने निघाले म्हणजे मोठमोठीं शहरें निर्माण होतात व या शहरांना अन्न व कच्चा माल पुरावविण्याचें काम शेतीचें असल्यामुळे यायोगें शेतीला उत्तेजन येतें. शिवाय एका देशांत होणाऱ्या विशेष वस्तू बाहेर पाठविणें व विशेषतः कच्चा माल बाहेर पाठविणें म्हणजे देशाची सुपीकता कमी करणें होय. कारण अशा पदार्थातील खताला देशाची जमीन मुकते. कॅरे- अमेरिकन अर्थशास्त्री- यानें संरक्षणाचें या मुद्यावर समर्थन केलें आहे. शिवाय देशांतच उद्योगवृद्धि केल्यानें नेआणीचा मोठा खर्च व त्रास वांचतो व म्हणून संरक्षणपद्धतीनें असे उद्योगधंदे वाढविणें इष्ट आहे. या प्रमाणाचेंही हल्लींच्या काळीं फार महत्व राहिलें नाहीं. कारण दळणवळणाच्या साधनांत अलीकडे अगदीं क्रांति होऊन गेली आहे. व सर्व जग आतां एक बाजार झाल्याप्रमाणें झालें आहे. शिवाय देशाची उत्पादक शक्ति इतकी वाढली आहे कीं, हल्लीं महत्वाचा प्रश्न बहिर्व्यापाराला संधि व अवसर शोधून काढण्याचा आहे. तिसरें प्रमाण- मजुरीवरील परिणाम- बहिर्व्यापाराच्या मीमांसेमध्यें असें दाखविलें आहे कीं, दोन देशांमध्यें व्यापार सुरू झाला म्हणजे पदार्थाच्या किंमती एक होतात व ज्या देशांतील मजुरीचा दर फाजील आहे तेथला दर कमी होऊं लागतो. म्हणजे इतर देशांत मजुरीचा दर कमी असल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या देशांवर झाल्याखेरीज राहत नाहीं. परंतु हा परिणाम मजुरांना अनिष्ट आहे व तो टाळण्याकरितांच संरक्षणाची जरुरी आहे असें संरक्षणवाद्यांचें म्हणणें आहे. या मुद्यावर अमेरिकेंत संरक्षणाचें मंडन केलें जातें. अमेरिकेंत मजुरीचा दर जास्त आहे व खुला व्यापार सुरू केल्यास हा मजुरीचा दर खालावेल म्हणून अमेरिकन लोकांना संरक्षण पहेिजे आहे. परंतु खुल्या व्यापाराच्या समर्थकांचें यावर उत्तर असें आहे कीं हें प्रमाण परस्परविरोधी आहे. अमेरिकेला संरक्षण पाहिजे. कां तर अमेरिकेत मजुरी जास्त आहे व तिचें संरक्षण केलें पाहिजे. परंतु याच्या अगदीं उलट कारणाकरितां रशियांत संरक्षणतत्वाचें समर्थन केलें