पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/426

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

280 किंवा कारखानदारानें काय-जाणें बरेंच दुरापास्त आहे, असें या गोष्टीवर संरक्षणवाद्यांचें उत्तर आहे. दुसरी गोष्ट- भांडवल व श्रम यांचें स्थानस्थैर्य-देशांतील. श्रम व भांडवल देशांतच राहतात. या तत्त्वावर बहिर्व्यापाराची मीमांसा बसविलेली आहे. सामान्यतः हें तत्व खरें आहे. परंतु इतिहासांत श्रम व भांडवल यांच्या देशांतरगमनाचीं पुष्कळ उदाहरणें आहेत, असें संरक्षणवाद्यांचें याला उत्तर आहे. तिसरी गोष्ट- आयातनिर्यातसमतोलन- आयात मालाची किंमत निर्यात मालानें दिली जाते व म्हणून आयातीचा प्रतिबंध करणें म्हणजे पर्यायानें निर्यातीचा प्रतिबंध करण्यासारखें आहे. परंतु परकी देशांनीं आपल्या देशांत कारखाने वाढविले व ती स्वयंपूर्ण झाली म्हणजे खुल्या व्यापाऱ्याच्या देशाचा धंदा नाहीसा होईल, असें संरक्षणवाद्यांचें उत्तर आहे. 'चवथी गोष्ट– जोंपर्यंत श्रम व भांडवल यांच्या योजनेपासून नफा होत आहे तोंपर्यंत हे श्रम व भांडवल अमुकच धंद्यांत घातले पाहिजेत ही गोष्ट देशाला महत्त्वाची नाहीं. परंतु हें विधान खुल्या व्यापाराचा जनक अॅडाम स्मिथ त्याला सुद्धा कबूल नव्हतें असें यावर उत्तर आहे. देशामध्ये नफा हा संपत्तीचा एक भाग आहे व नफा फाजील झाला तर उत्पनाचे दुसरे वाटे-भांडें व मजुरी-हे कमी होतात, याकरितांच वसाहतीचा व्यापार विशेष वर्गाच्या अगर संस्थेच्या हातीं देणें बरोबर नाहीं असें अॅडाम स्मिथचें म्हणणें होतें. भांडवलाच्या योजनेचा चांगुलपणा अॅडाम स्मिथच्या मनानें त्यावर मिळणाऱ्या नफ्यावरूनच फक्त ठरवावयाचा नाहीं, तर त्यावर पोसल्या जाणाऱ्या मजुरांच्या संख्येवरून व देशांत खर्च होत असलेल्या भांडवलाच्या रकमेवरून ठरवावयाचा असतो. या तत्त्वाप्रमाणें अॅडाम स्मिथनें शेतकी, कारखाने, अन्तर्व्यापार, बहिर्व्यापार व नेआणीचा व्यापार अशी धंद्याच्या चांगुलपणाची परंपरा ठरविली आहे व अॅडाम स्मिथच्या म्हणण्यांत बराच तथ्यांश आहे. शेवटची गोष्ट-खुल्या व्यापाराच्या तत्वांतील संगतता. खुला व्यापार हें तत्त्व अन्तर्व्यापार व बहिर्व्यापार या दोन्हींलाही श्रेयस्कर आहे असें या व्यापाराच्या समर्थकाचें म्हणणें आहे. संरक्षण