पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४०९ ] बहिर्व्यापार हा अन्तर्व्यापाराप्रमाणें आहे व ज्याप्रमाणें अन्तर्व्यापारांत जितके अडथळे कमी तितके चांगले, त्याचप्रमाणें बहिर्व्यापाराची अवस्था आहे. ज्याप्रमाणें अदलाबदलींत एकाचा फायदा व एकाचें नुकसान असें सहसा होत नाहीं तोच प्रकार राष्ट्राचा आहे. जर मालाच्या आयातीला प्रतिबंध केला तर मालाच्या निर्यातीलाही आपोआप प्रतिबंध झाला पाहिजे. याकरितां खुलाव्यापार हाच देशाच्या भरभराटीला अवश्यक आहे. खुल्या व्यापारानें प्रत्येकाला आपला माल सर्वात महाग बाजारांत विकतां येईल व सर्वांत स्वस्त बाजारांत माल विकत घेतां येईल व यायोगें प्रत्येकाच्या नफ्यांत वाढ झालीच पाहिजे. शेवटीं खुल्या व्यापारानें प्रत्येक देशाला आपल्या उत्पादक घटकांची कार्यक्षमता वाढवितां येते. ज्या ज्या वस्तू करण्यांत एका देशाला विशेष सोयी आहेत त्या त्या वस्तूंच्या उत्पत्तीकडे सर्व लक्ष व आपलें सर्व सामर्थ्य लावितां येईल. यायोगें सर्व जगाची संपात्ति वाढेल. अर्थात ज्याप्रमाणें श्रमविभागाच्या तत्त्वानें संपत्तीच्या पैदाशीचा विलक्षण वेग वाढतो, त्याप्रमाणेंच खुल्या व्यापाराचे योगानें जगांतील संपत्तीच्या वाढीत भर पडते. कारण खुल्या व्यापाराचें तत्त्व म्हणजे श्रमविभागाचें एक अंग होय. ज्याप्रमाणें धंद्याधंद्यामधील श्रमविभाग असतो त्याप्रमाणें खुल्या व्यापारानें जगांतील निरनिराळ्या भागांमध्यें श्रमविभाग होतो व ज्या देशाला जें चांगल्या तऱ्हेनें करितां येतें तें त्याला करुन देण्यांत जगाचा फायदा आहे. तेव्हां खुला व्यापार म्हणजे स्थानिक श्रमविभागच होय. खुल्याव्यापाराच्या तत्त्वाच्या समर्थनाचें सर्व रहस्य वरील विधानांत गोंविलेलें आहे. बारकाईनें हीं विधानें. पाहिली म्हणजे यांमध्यें खालील गोष्टी गृहीत धरल्या आहेत असें दिसून येईल. पहिली गोष्ट-भांडवल व श्रम यांची परिवर्तनसुलभता. देशांतील श्रम व भांडवल हीं कांहीं एक तोटा किंवा त्रास न होतां एका धंद्यांतून दुसऱ्या धंद्यांत घालतां येतात. तेव्हां परदेशच्या मालाच्या चढाओढीत देशांतील एखादा धंदा डबघाईस आला तर लागलेच त्या लोकांना दुसऱ्या धंद्यांत जातां येईल; परंतु हल्लींच्या काळीं भांडवल व श्रम यांमध्यें इतकें विभाक्तिकरण झालेलें असतें कीं, एक धंयांतून दुसया धंद्यांत मजुरानें