पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४०૮ ] बाबतींत अग्रस्थान मिळविलें. जेव्हां इंग्लंडला इतर देशांच्या चढाओढीची मुळींच भीति राहिली नाहीं तेव्हांच संरक्षणाचें धोरण हेच व्यापाराच्या वाढीस प्रतिबंधक भासूं लागतें, व मग या धोरणाविरुद्ध इंग्लंडमध्यें चळवळ सुरू झाली व या चळवळीचा शेवट १८४६ मध्यें झाला व इंग्लंडमध्यें खुल्या व्यापाराच्या तत्वाचा पूर्णपणें विजय झाला, व लोकमतावर खुल्या व्यापाराची पूर्णपणें छाप बसली. अर्थशास्त्रांतील अभिमतपंथ अप्रतिबंधव्यापारवादी होता व इंग्लंडांतील सर्व अर्थशास्त्री याच मताचे अनुयायी होते. यामुळे कित्येक दिवसापर्यंत इंग्लंडला खुल्या व्यापारतत्वाचे माहेरघर समजत असत. प्रथमतः युरोपांतील कांहीं राष्ट्रांनीं इंग्लडचें अनुकरण करण्याचा उपक्रम केला. परंतु राष्ट्रीय कल्पनेच्या वाढीबरोबर युरोपांतील सर्व राष्ट्रांमध्यें संरक्षणतत्त्वाला जोर आला व गेल्या दहावीस वर्षीपासून खुल्या व्यापाराच्या खुद्द माहेरघरींच घरभेदीपणा शिरला. खुल्या व्यापाराच्या विरुद्धमोहीम तेथें सुरू झाली आहे व अजून या प्रश्नाचा निकाल लागला नाहीं. तेव्हां खुल्या व्यापाराचें तत्व व संरक्षणाचें तत्व यांची आंदोलनासारखी स्थिति झालेली आहे. एके काळीं संरक्षणाचा विशेष जारीचा प्रसार होता. पुढें इंग्लंडनें खुल्या व्यापाराचा अंगीकार केल्यापासून खुल्या व्यापाराकडे कल झुकतो कों काय असें वाटत होतें. परंतु आंदोलनाची गति पुनः आतांसंरक्षणाकडे फिरल्यासारखी वाटत आहे. तेव्हां या प्रश्नाच्या मुळाशीं कोणतीं तत्वें आहेत व हा प्रश्न असा हेलकावे खात कां राहतो याचा विचार केला पाहिजे. खुल्या व्यापाराचें स्वरूप सहज ध्यानांत येण्यासारखें आहे. खुल्या व्यापाराचें तत्व बहिर्व्यापर व अंतर्व्यापार यांत कांहीं एक अंतर मानीत नाही. खुल्या व्यापाराचें रहस्य म्हणजे घरगुती वसाहती किंवा देशी मालामध्यें कोणताही भेदभाव न मानणें होय. हें तत्व या सर्व मालाला सारखें लेखतें. अमक्याला उत्तेजन द्यावयाचे व अमक्याला द्यावयाचें नाही असें हें तत्व समजत नाहीं. मालावर कर बसविलेच तर ते फक्त उत्पन्नाच्या बाबी म्हणून बसविले जातात. त्यांचा हेतु कांहीं मालाला उत्तेजन व कांहीं मालाची पीछेहाट हा नसतो. अप्रतिबंध व्यापारवाद्यांच्या मताप्रमाणे वरील तत्वच देशाच्या औद्योगिक प्रगतीस सदोदित श्रेयस्कर आहे आणि त्यांनीं पुढे आणिलेलीं प्रमाणें अगदीं सुलभ व उघड उघड आहेत.