पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/418

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४०४] अनुकूल हुंडणावळीचा दर असें म्हणतात. व देशाच्या नाण्याच्या ठराविक दरापेक्षां परकी नाणें कमीं मिळूं लागलें म्हणजे त्याला प्रतिकूल हुंडणावळीचा दर म्हणतात. वर सांगितलेंच आहे कीं, देशाच्या निर्यात व्यापारापेक्षां आयात व्यापार जास्त असला म्हणजे निर्यात व्यापा-यांच्या विनिमयपत्रांना मागणी जास्त झाल्यानें हुंडणावळीचा भाव प्रतिकूल होतो व देशाचा निर्यात व्यापार आयात व्यापारापेक्षां जास्त असला म्हणजे हुंडणावळीचा भाव अनुकूल होतो. परंतु यावरून देशांत आयात जास्त असणें वाईट व निर्यात जास्त असणें चांगलें असें मात्र नाहीं. इंग्लडचा आयात व्यापार निर्यात व्यापारापेक्षां नेहमींच मोठा असतो. तरी इंग्लंड हा देश जगांत जास्त श्रीमंत व जास्त भरभराटीत आहे; हिंदुस्थानाचा निर्यात व्यापार आयात व्यापारापेक्षां जास्त असतो. परंतु हिंदुस्थानाइतका दरिद्री देश सुधारलेल्या राष्ट्रांत क्वचितच सांपडेल. सारांश, देशांतील निव्वळ आयात निर्यात मालाच्या समतोलनावरून देशाच्या भरभराटीचें निदान करणें बरोबर नाहीं. मागें एका भागांत सांगितलेंच आहे की, आयात व्यापारापेक्षां निर्यात व्यापार जास्त असला म्हणजे व्यापाराचें समतोलन अनुकूल आहे असें उदीमपंथी लोक समजत असत. परंतु देशाची औद्योगिक स्थिति यावरून मुळीच कळत नाहीं. देशाच्या भरभराटीचें खरें निदर्शक ह्मणजे संपत्तीची उत्पत्ति व संपत्तीचा व्यय हीं दोन्हीही वाढत जाणें व संपत्तीची उत्पात्ति व्ययापेक्षां केव्हांही खाली न जाणें हें होय. याचें विवेचन मागील एका भागांत आलें आहे. असो. आतां देशाच्या हुंडणावळीचा भाव ठरतांना व विनिमयपत्रांचा व्यवहार ठरतांना फक्त आयात माल व निर्यात माल एवढ्याच बाबी विचारांत घ्यावयाच्या असतात असें मात्र नाही. केव्हांही आयात निर्यात व्यापार ही बाब सर्वांत महत्वाची असते हें खोटें नाही. तरी पण दुस-याही बाबी असतात. उदाहरणार्थ, एका देशांतून दुस-या देशांत कर्ज दिलें जात असेल किंवा पूर्वीच्या कर्जाचें व्याज एका देशाला द्यावें लागत असेल. तसेच एक दुस-या देशावर अवलंबून असल्यामुळे त्या परतंत्र देशाला स्वतंत्र देशाला खंडणी द्यावी लागत असेल, किंवा राज्यकारभार चालविण्याचा खर्च द्यावा लागत असेल. शिवाय एका देशातील व्यापाऱ्यांच्या हातीं दुसऱ्या देशांतील सर्व व्यापार असेल व त्याचा नफा त्या देशाला