पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/410

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३९६] ज्या देशांत जो माल तयार करण्यांत विशेष सोयी आहेत त्या देशांतून इतर देशांनीं माल घेणें होय व त्या देशानें तोच माल तयार करणें हा होय. या गोष्टीचा प्रत्यक्ष दाखला म्हणजे औद्योगिक क्रांतीपासून कापड करणें हें इंग्लंडला फार सोयीचें होतें. यामुळें इंग्लंडामध्यें कापड करण्याचा धंदाच विशेष जोरांत येऊन अमेरिका व जर्मनी हीं राष्ट्रें औद्योगिक बाबतींत पुढें येण्यापूर्वी बहुतेक सर्व जगाला एकटें इंग्लंड सर्व कापड पुरवीत असे. व इंग्लंड व हिंदुस्थान या देशांमध्यें व्यापार सुरू झाल्यानंतर प्रथमतः हिंदुस्थानचें कापड युरोपांत जाई. कारण त्या काळी हिंदुस्थानाला कापड करण्याची जास्त सोय होती. परंतु वाफेच्या शक्तीच्या शोधानंतर हिंदुस्थानची ही सापेक्ष सोय नाहींशी होऊन हातमागापेक्षां वाफेच्या मागाचें कापड स्वस्त होऊं लागले. यामुळे हिंदुस्थानांतील कापडाचा व्यापार हळूहळू कमी होत चालला व तो अगदी संपुष्टांत आला. व हिंदुस्थानाला शेतकीची विशेष सोय असल्यामुळे शेतकीवर जास्त मारा येत चालला.

  वरील काल्पनिक व प्रत्यक्ष दाखल्यावरून बहिर्व्यापाराचे खालील फायदे दृष्टोत्पत्तीस येतील. जो माल एका देशांत मुळींच होत नाहीं असा माल बहिर्व्यापारानें दुस-या देशाला मिळू लागेल. तसेच बहिर्व्यापारानें आयात मालाची किंमत कमी होईल व त्या गिऱ्हाइकांना अर्थात देशांतील लोकांना माल स्वस्त मिळून त्यांचा फायदा होईल. मात्र यामध्यें असें गृहीत धरलें आहे कीं, परदेशचा स्वस्त माल येऊं लागल्यानें त्या देशांतील तो धंदा करणारे लोक व त्यांतील मजूर यांना आपलें भांडवल व श्रम दुस-या धंद्यांत घालतां येतील. कारण आयात मालाची किंमत देशांतील कांहीं माल बाहेर पाठवून शेवटीं दिली जाते. यामुळे अशा निर्यात मालाची मागणी वाढून त्या धंद्यांत हें भांडवल व श्रम जातील.
   परंतु बहिर्व्यापारापासून देशाचें कधीही नुकसान होणारच नाहीं असं मात्र नाहीं. तरी या नुकसानीच्या बाबींचाही विचार केला पाहिजे.
  बहिर्व्यापारानें एखाद्या मयादित व कालेंकरून नाहींशा होणा-या मालाचा खप फारच वाढून देशाला तो माल पुढें सततचाच महाग होण्याचा संभव आहे. देशांतील कच्चा माल बहिर्व्यापाराने जर फार जाऊं तर तें देशाच्या जमिनीच्या नुकसानीचें होईल. कारण या कच्च्या मालाच्या व्यर्थ जाणा-या द्रव्याचें जमिनीला खत होत असतें.