पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३९१] रिवाजाचा फरक, भाषाभेद,पैशाचा भेद वगैरे अडचणी आड येतात यामुळें परदेशाच्या व्यापारांत देशांतील व्यापाराइतकी चढाओढ शक्य नसते व यामुळे बहिर्व्यापारातील मालाचें मोल अंतर्व्यापाराच्या मोलाच्या तत्वांनी ठरत नाहीं. म्हणून बहिर्व्यापाराची व त्याच्या मोलाची मीमांसा स्वतंत्र तऱ्हेची होते व म्हणूनच या विषयाचा स्वतंत्रपणे विचार करणें जरुर आहे असा समज होऊन अर्थशास्त्रांत तसा परिपाठ पडला.

  अर्वाचीनकाळीं सुधारलेल्या दळणवळणाच्या साधनांनीं देशांदेशांतील अंतर पुष्कळच कमी झालं आहे. तसेंच हल्ली भांडवल हें हव तिकडे सहज पाठवितां येतें. या सर्व साधनांच्या वाढीमुळे व प्रसारामुळे सर्व जग म्हणजे एक मोठा बाजारच बनलेला आहे व यामुळे अर्वाचीन काळीं अंतर्व्यापार व बहिर्व्यापार यांमध्यें विशेष फरक राहिला नाहीं; निदान पूर्वाच्याइतका तीव्र फरक आतां राहिला नाहीं हे कबूल केलें पाहिजे. तरीपण सामान्यतः दोहोंमध्यें फरक आहे व तो कायम राहणार यांतही शंका नाहीं.
  जरी उदीम पंथाच्या मताप्रमाणें बहिर्व्यापाराला महत्व होतें तरी कांहीं एका विशेष प्रकारचाच बहिर्व्यापार हा देशाला फायदेशीर आहे अशी समजूत होती; यामुळें या बहिर्व्यापारावर फार कडक नजर असे व परदेशी व्यापाऱ्यांना देशांत राहण्यासंबंधानें फार जाचाचे नियम पाळावे लागत. कांहीं देशांत तर परकी व्यापारी किंवा मनुष्य हा शत्रूच समजला जात असे व यामुळे देशांत असे व्यापारी किंवा मनुष्य येण्याचीच मनाई असे. उदाहरणार्थ, अगदीं अर्वाचीन काळपर्यंत चीन देशांत परकी लोकांना व व्यापा-यांना अगदीं मज्जाव होता. तेव्हां देशांतील बहिर्व्यापारापासून सामान्यतः देशाला कोणते फायदे होतात हें प्रथमत: पाहिलें पाहिजे. व मग या बहिर्व्यापाराच्या सुरुवातीपासून देशांतील मालाच्या किंमतीवर, देशाच्या उद्योगधंद्यावर व देशांतील एकंदर लोकांवर काय परिणाम होतात हें  पाहिलें पाहिजे.
   एकंदर विनिमयाचे जे फायदे आहेत ते बहिर्व्यापाराचे  आहेत हें उघड आहे. कारण बहिर्व्यापार हें विनिमयाचें एक परिणत अंगच आहे. ज्याप्रमाणें परस्परांच्या गरजा परस्परांनीं उत्पन्न केलेल्या मालानें भागविणें ह विनिमयाचें कार्य आहे, त्याचप्रमाणें देशादेशांमधील गरजा भागविणें हें