पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२८]

 ऐतिहासिक पंथाच्या थोडेसे आधीं झालेले, परंतु ज्यांच्या श्रमानें ऐतिहासिक पंथ अप्रत्यक्षपणें उदयास आला अशा दोन लेखकांचा येथें उल्लेख करणें रास्त आह. ते लेखक अॅडम म्युल्लर व फ्रेडारिक लिस्ट हे होत.<gr>  अॅडम म्युल्लरनें मध्यकाळच्या औद्योगिक संस्था व वाली यांचें समर्थन केलें आहे, व त्याच्या काळच्या उदारमतपंथाचा निषेध केला आहं. त्याचे मतें अॅडम स्मिथचें अर्थशास्त्र हें व्यक्तीच्या संपत्तीच्या वाढीचें शास्त्र आहे. तें राष्ट्रीय दृष्टीनें विचार करीत नाहीं, इतकेंच नव्हे, तर तें संपत्तीच्या पलीकडे कांहीं विशेष महत्वाच्या गोष्टी आहेत हेंही जाणत नाहीं. अर्थशास्त्रानें राष्ट्राच्या बौद्धिक, नैतिक व औद्योगिक अशा सर्व बाजूंचा विचार करून राष्ट्राच्या हिताच्या गोष्टी कोणत्या हें ठरविलें पाहिजे असें म्युल्लरचें ह्मणणें होतें. श्रमविभाग हा भांडवलाच्या वाढीवर अवलंबून आहे; हें अॅडम स्मिथच्या ध्यानांत नव्हतें; तसेंच श्रमविभागाच्या तत्वाचें पूरक तत्व श्रमसंघटना याचा अॅडम स्मिथनें विचार केला नाहीं, वगैरे दोष म्युल्लरनें अॅडम स्मिथच्या ग्रंथांत दाखविले आहेत. शेवटीं म्युलूरचें ह्मणणें असें आहे कीं, अॅडम स्मिथचें अर्थशास्त्र समुद्रानें वेष्टित अशा इंग्लंडसारख्या पृथक् देशास मात्र लागू आहे; परंतु यांतील तत्वें युरोपांतील इतर देशांस जर लागू केलीं तर ती गोष्ट राष्ट्रीयदृष्ट्या हानिकारक होईल. मुल्लरच्या लेखांत दिसून येणारा राष्ट्रीयपणा लिस्टनें जास्त जोरानें पुढें आणला व त्यानें आपल्या ग्रंथास राष्ट्रीय अर्थशास्त्र असें नांव दिलें. त्याचे मतें स्मिथचें अर्थशास्त्र हें विश्वव्यापी आहे म्हणजे यामध्यें सर्व जग एकाच राज्यपद्धतीखालीं आहे असें गृहीत धरलें आहे. निदान त्यांत जगांत सध्या प्रचलित असलेल्या निरनिराळ्या व स्वतंत्र राज्यपद्धतीकडे कानाडोळा केला आहे व सर्व जगाच्या सांपत्तिक कल्याणाचा मार्ग कोणता हें ठरविलें आहे. त्यानें अप्रतिबंध व्यापाराचें समर्थन केलें आहे तें या दृष्टीनें बरोबरही आहे. परंतु लिस्ट याला या दोन्ही गोष्टी कबूल नव्हत्या. त्याचे मतें मनुष्याच्या स्वभावाकडे लक्ष देतां व सध्याच्या जगाच्या व्यवस्थेकडे लक्ष देतां प्रत्येक राष्ट्रानें आपापल्या हिताकडे पाहणें एकंदरींत हितावह आहे, व खरी मानवी प्रगति या मार्गानेच होईल. तेव्हां प्रत्येक राष्ट्रानें आपण पूर्णपणें स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्याची खटपट केली पाहिजे. देशाच्या सर्वांगीय वाढीस उद्योगवैचित्र्य अवश्यक आहे.