पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३८७ ] कांहीं निरनिराळ्या नाण्यांची नुसती देवघेव करितात; यांना सराफी पेढ्या म्हणतात. कांहीं फक्त मुदतीच्या हुंड्यांचा व्यापार करितात. अशा प्रकारानें तिकडे पेढीच्या व्यापारांत श्रमविभागाचें तत्त्व शिरलें आहे. याचें कारण तिकडे व्यापार व उद्योगधंदे फार वाढले आहेत; व त्यामुळे पेढीचीं कामेंही फार वाढलीं आहेत. इतकीं कीं तीं सर्व एका पेढीनें करूं म्हणणें शक्य नाहीं. यामुळे तिकडे पेढ्यांचे वर नमूद केलेले प्रकार बनले आहेत. आपल्या इकडे अजून फारसा व्यापार वाढला नसल्यामुळे इतक्या श्रमविभागाचें कारण पडलें नाहीं. प्रत्येक पेढी, ह्या सर्व प्रकारच्या पेढ्यांचीं बहुतेक कामें करते. आणखी एक प्रकारच्या पेढ्या युरोपांत आहेत.त्या म्हणजे चलनी नोटा काढण्याचा अधिकार पुष्कळ पेढ्यांत तिकडे सरकारनें दिलेला आहे व कांहीं पेढ्या हें काम स्वतंत्रपणें करितात. किंवा निदान पेढीच्या दोन शाखा असतात-एक चलनी नोटा काढणारी व दुसरी बाकीचीं कामें करणारी. परंतु हिंदुस्थानांत हा सर्व अधिकार सरकारनें आपल्या हातांत ठेविला आहे. सरकारी नोटा काढण्याचा कायदा १८६१ सालीं प्रथमतः पास झाला. व तेव्हांपासून सरकारनें नोटा काढण्याचें एक नवें खातें स्थापन करून त्याच्याकडे या कामाची सर्व व्यवस्था दिली. ५ रुपयांपासून १०००० रुपयांपर्यंत निरनिराळ्या रकमेच्या नोटा सरकार काढतें. कोणीही रोख रुपये दिले म्हणजे त्याला तितक्या नोटा मिळतात. तसेच कोणी नोटा करन्सी ऑफिसमध्यें घेऊन गेल्यास त्याला रोख पैसे मिळतात. या नोटा बनावट करतां येऊं नयेत म्हणून फार काळजी घेतली जाते व त्याची एक पद्धत अशी आहे कीं, सरकारी तिजोरींत नोट गेली म्हणजे ती नोट नाहींशी करतात व दुस-य नव्या नंबराची नोट काढतात. अर्थात या नोटांच्या कामांत सरकार विश्वकम्यांचें काम करीत असतें. रोज ज्याप्रमाणें हजारों प्राणी मरतात व जन्मतात त्याप्रमाणेंच रोज हजारों नोटांचा जन्म होतो व हजारोंना मरण येतें. या नोटा दर्शनी हुंड्या असल्यामुळे सरकारास कांहीं प्रमाणानें रोख पैसा नेहमीं जवळ ठेवावा लागतो. या सर्व पैशाचा निराळाच हिशेब असतो. त्याचा व नाणें पाडणा-या खात्याचा निकट संबंध असतो. हिंदुस्थानांत एकंदर ८ नोटा पाडण्याचीं ऑफिसें आहेत. ज्या सर्कलची जी नोट असेल