पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३८४]

नोटा काढलेल्या असल्या तर सरासरी त्या रकमेच्या एकतृतीयांशाच्या इतकी रोख रक्कम पेढीच्या खजिन्यांत ठेविली म्हणजे बस्स होतें. कारण चलना नोटा असलेले एकूण एक गृहस्थ पेढीकडे रोख पैसे मागण्यास एकदम कधीच येत नाहींत. यामुळे या पेढीनें सत्तर हजारांचें अगदीं नवें भांडवल देशांत उत्पन्न केल्यासारखें होतें. कारण जरी चलनी नोटा नुसत्या कागदाच्या असतात तरी जोपर्यंत त्या लोकांपाशीं असतात तोंपर्यंत त्या पैशाचेंच कार्य करीत असतात.
  पेढ्याचे वर्गीकरण निरनिराळ्या तत्त्वांवर केलेलें आढळतें. पेढीच्या स्वरूपाचें निरूपण करतांना पेढीचीं कामें सांगितलीं होतीं. आतां या निरनिराळ्या कामांच्या धोरणानें युरोपांत निरनिराळे प्रकार झाले आहेत. वर्गीकरणाचें दुसरें तत्त्व म्हणजे स्वामित्वावरून वर्गीकरण ठरविणें हें होय. बहुतेक सर्व देशांत या तत्त्वानुरूप तीन प्रकारच्या पेढ्या दिसतात. एक खासगी पेढ्या, दुस-या संयुक्त तत्त्वावरील पेढ्या व तिस-या सरकारी पेढ्या. यांपैकीं पहिल्या आपल्या देशांत पुष्कळ दिवसांपासून चालू आहेत. पेढीवाला हा फार जुना शब्द आहे व या पेढ्यांचा उल्लेख पेशवाईपासूनच्या कागदोपत्रांत व जमाखर्चात दिसून येतो. परंतु हे सर्व पेढीवाले खासगी लोक असत. यांत केव्हां केव्हां भागीदार असत, परंतु हे फार थोडे असत व सर्व भागीदार प्रत्येक पेढीवर काम करीत व पेढीचा कारभार चालवीत. संयुक्त भांडवलाचें तत्व आपल्या लोकांस अगदीं परिचित नाहींसें दिसतें. सामान्य लोकांकडून थोड्या रकमांचें मोठें भांडवल जमा करून त्या भांडवलावर मोठमोठे कारखाने, व्यापार व उदीम चालविण्याची आपल्याला मुळींच माहिती नाही; व म्हणूनच अशा तत्त्वावर निघालेल्या संस्था आमच्याइकडे बुडालेल्या आहेत व यामुळें लोक अशा संस्थांत पैसे वालण्यास धजत नाहींत. पहिल्या प्रथम युरोपमध्येंही असाच प्रकार झाला. या तत्त्वामुळे गरीब लोकांजवळ पडून राहिलेली संपत्ति उत्पादक भांडवल बनतें, दुसरें अशा संस्थेचे हिशेब प्रसिद्ध होत असल्यामुळें लबाडी करण्यास कमी जागा असते. देशांतील निरनिराळ्या धंद्यांची स्थिति कशी आहे हें प्रसिद्ध झालेल्या जमाखर्चावरून ताडतां यतें. तसेंच संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावरील उद्योगांत खासगी उद्योगापेक्षा कायमपणा असतो. खासगी कामांत कर्ता मनुष्य मेला म्हणजे