पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३८२]

पद्धतीनें हुंड्यांची देवघेव एक लाखाची झाली असतां रोखपैशाची नेआण हजार पांचशेवर जाण्याचें कारण नाहीं.
 पेढीचें दुसरें महत्त्वाचें कर्तव्यकर्म म्हणजे कर्जाऊ पैसे देण्याचें होय. पेढीवाले लोकांस सोनेंनाणें अगर दागदागिने गहाण घेऊन व्याजानें पैसे कर्जाऊ देतात, किंवा स्थावर मिळकतीच्या तारणावर पैसे देतात, किंवा नुसत्या पतीवर कर्जाऊ पैसे देतात. तसेंच ज्या माणसांची पेढीजवळ नेहमीं ठेव असते अशा माणसांस केव्हां केव्हां ठेवीच्या रकमेपेक्षां जास्त पैसे देतात, किंवा प्रॉमिसरी नोटा लिहून घेऊन पैसे देतात. या सर्व व्यवहारांत दिलेल्या पैशावर व्याज चालू असतें, परंतु पेढीवाल्यास दुसऱ्या एका प्रकारानें दुस-यास कर्ज देतां येतें. तें कर्ज म्हणजे मुदतीची हुंडी पटविणें होय. एका मनुष्यास दुस-याकडून दोन महिन्यांनीं पैसे यावयाचे असतात. पहिल्या माणसाजवळ दुस-या माणसाची मुदतीची हुंडी असते किंवा प्रॉमिसरी नोट असते. हा दुसरा माणूस शहाजोग असल्यास पेढीवाले पहिल्या मनुष्यास ही हुंडी किंवा प्रॉमिसरी नोट घेऊन रोख पैसे देतात. दोन महिन्यांनीं मिळणा-या पैशांबद्दल आज रोख पैसे द्यावयाचे म्हणजे पेढीवाले कांहीं ठरीव शेंकड्याप्रमाणें कसर कापून घेतात. ही कसर म्हणजे एक प्रकारचें व्याजच होय. खरोखरी मुदतीच्या हुंडीवर किंवा दुसऱ्याच्या मुदतीच्या प्रॉमिसरी नोटांवर आज रोख पैसे घेणें म्हणजे गहाणावर पैसे कर्जाऊ घेण्यासारखें आहे. मात्र गहाण ठेवलेली वस्तु कर्ज नेणारा मनुष्य कर्जाऊपैसे फेडून परत घेऊन जातो. येथें तसा प्रकार होत नाही. मुदतीची हुंडी किंवा प्रामिसरी नोट यांच्या स्वामित्वाचा हक पूर्णपणें पेढीकडे येतो.
 पेढीचें तिसरें कर्तव्यकर्म ठेवी ठेवण्याचें आहे. या ठेवीवर पेढी कधीं व्याज देते अगर देत नाही.ठेवी कांहीं विवक्षित मुदतीच्या असतात, अंगर चालू खात्यावर असतात. मुदतीच्या ठेवींवर पेढी बहुधा व्याज देते. चालू खात्यावर मात्र पेढीच्या गरजप्रमाणें व्याज दिलें जातें किंवा दिलें जात नाहीं. या कामावरूनच पेढीस पैशाची देवघेव करणारी संस्था म्हणतात.पेढी ज्या लोकांच्या जवळ शिल्लक पैसे असतात त्यांचे जवळून पैसे कर्जाऊ अगर उसने घेते व ज्या लोकांस पैशाची जरूरी आहे त्या लोकांस पैसे कर्जाऊ देते. ज्या