पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/391

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३७९] खासगी पेढ्यांपेक्षां संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावर चाललेल्या पेढ्यांची पत व साख स्वाभाविकपणें जास्त असते. कारण यांत पुष्कळ लोकांचें भांडवल असतें व ज्याचा ज्याचा बँकेंत भाग असतो तो तो मनुष्य आपल्या इष्टमित्राजवळ आपल्या बँकेच्या शाखेबद्दल उद्गार काढतो. खासगी बँकांस हा फायदा मिळत नाहीं. शिवाय खांसगी बँकेची व्यवस्था वाईट माणसांच्या हातांत जाण्याचा संभव असतो. पेढीचा मालक वाईट मनुष्य निघाल्यावर त्यास दूर करतां येत नाहीं; परंतु संयुक्त भांडवलाच्या तत्वावर चाललेल्या पेढीच्या व्यवस्थापकावर सर्व भांडवलवाल्यांचा अधिकार असतो व एखादा डायरेक्टर वाईट निघाल्यास त्यास ताबडतोब दूर करतां येतें. यामुळे स्वाभाविक अशा पेढ्यांची व्यवस्था चांगलीच असते. पेढीच्या व्यापाराची भरभराट तिच्या पतीवर फार अवलंबून असते. कारण पेढीवाल्यास पत म्ह्णजे पैसा होय. संयुक्त भांडवलाच्या तत्वावर निघालेल्या पेढीच्या उत्तम पतीमुळें तिच्या चलनी नोटा नाण्यासारख्या सभोंवतालच्या प्रांतांत चालतात. खासगी पेढ्याही असा व्यापार करतात खरा; परंतु खासगी पेढ्यांच्या साखीबद्दल लोकांत शंका उत्पन्न झाल्यास त्यावर एकदम ठेवी परत करण्याबद्दल व नोटांबद्दल रोख पैसा देण्याबद्दल फार मागण्या होतात. अशी एकदम मागणी आली असतां पेढीजवळ पुरेसे पैसे नसतात व यामुळे पेढीचें दिवाळे निघतें. अशा स्थितींत पेढीस मिळतील तिकडून, पडेल त्या व्याजानें पैसे कर्जाऊ आणणें भाग पडतें व यामुळे पेढीचें फार नुकसान होतें किंवा पेढी अजीबाद बुडते; परंतु संयुक्त भांडवलाच्या तत्वावर चाललेल्या पेढीवर असा प्रसंग फार थोड्या वेळां येतो. कारण वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें तिच्यावर लोकांचा भरंवसा असल्यामुळे अशी एकदम मागणी होत नाहीं व यदाकदाचित झाली तरी पुष्कळ भागीदारांजवळून कर्जाऊ पैसे घेण्यास सांपडतें. शेवटीं संयुक्त भांडवलाच्या तत्वावर चाललेल्या पेढीचे सर्व जमाखर्च वेळोवेळीं प्रसिद्ध होत असल्यामुळे या पेढीच्या व्यवहारांत लबाड्या होण्याचा संभव फारच कमी असतो. या सर्व कारणांमुळे संयुक्त भांडवलाच्या पेढ्या पिढ्यानुपिढ्या टिकल्याची उदाहरणें आहेत व बँक ऑफ इंग्लंडचें उदाहरण तर अद्वितीय आहे. तिच्या स्थापनेपासून तिची सारखी भरभराट होत गेली आहे इतकेंच नव्हे, तर ती सर्व बैंकांत प्रमुखस्थान