पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/390

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ২৬2 ] देशांत नाण्यांचा व रोखपैशाचा प्रवाह गेल्यामुळे देशांत पैशाची तूट पडण्याचा संभव असतो व पैशाची तूट झाल्यास व्यापारास एकदम धक्का बसतो; परंतु या अनर्थापासून इंग्लंडदेश या बँकेमुळे कित्येक वेळां वांचला आहे. कारण अशा आणीबाणीच्या प्रसंगीं ही बँक वाटेल तितक्या चलनी नोटा काढीत असे व चलनी नोटांबद्दल मागेल तेव्हां रोख पैसा देऊं असा जो करार असतो त्या कराराची अंमलबजावणी कांही विवक्षित कालपर्यंत रद्द करण्याचा कायदा सरकार करून देत असे. अशा त-हेनें या बँकेमुळे इंग्रज सरकारास, इंग्लंडच्या व्यापारास व देशांतील एकंदर लोकांस अनेक फायदे झाले आहेत. प्रथमतः ही पेढी स्थापन झाली, त्या वेळीं तिच्याबद्दल बराच गैरसमज व पुष्कळशा कुशंका काढल्या होत्या असें वर सांगितलें आहे. याशिवाय लंडनमधील खासगी पेढीवाले या अर्धवट सरकारी पेढीचा हेवा करीत व या पेढीचें दिवाळे वाजविण्याकरितां ते पुष्कळ युक्त्या करीत. या बँकेच्या पुष्कळ चलना नोटा जमवून त्या बँकेकडे एकदम नेऊन बँकेची फजिती करण्याचा या खासगी पेढीवाल्यांनीं पुष्कळ प्रयत्न केला, परंतु तो सिद्धीस गेला नाहीं. संयुक्त भांडवलाच्या तत्वावर निघालेली ही पहिलीच पेढी असल्यामुळें त्याबद्दलही पुष्कळ गैरसमज होता. संयुक्त भांडवलाचें तत्त्व आता सर्व व्यापारांत रूढ झालें आहे व या तत्वांमुळें व्यापारास पुष्कळ उत्तेजन मिळालें आहे व इंग्लंडमध्यें भांडवलाची कधीच वाण पडत नाहीं. परंतु या तत्त्वाचा प्रकार त्या काळीं नवीन होता. त्या वेळीं पुष्कळ कंपन्या बुडालेल्या होत्या. यामुळे या तत्वाबद्दल कांहीं दिवस लोक साशंक असत. अॅडाम स्मिथसारखा प्रसिद्ध अर्थशास्त्रवेत्तासुद्धां या संयुक्त भांडवलाच्या तत्वास अनुकूल नव्हता. तेव्हां १६९४ सालीं या संयुक्त तत्वावर निघालेल्या बँक ऑफ इंग्लंडबद्दल गैरसमज व्हावा हें अगदीं साहजिक आहे; परंत या बँकेच्या उत्तम व्यवहारानें गैरसमज नाहीसा झाला. इतकेंच नाही; तर संयुक्त तत्त्वापासून होणारे फायदे लोकांच्या ध्यानांत येऊं लागले. अॅडाम स्मिथ जरी या तत्वाविरुद्ध होता तरी जर कोणताही व्यापार संयुक्त भांडवलाच्या तत्वावर फायदेशीर रीतीनें करतां येईल तर तो पेढीचाच व्यापार आहे असें तो म्हणत असे.