पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/386

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३७४]

व्यापा-यांस निरनिराळ्या ठिकाणीं पैसे पोंचविणें, वगैरे कामें या देशांतील पेढ्या करीत. शिवाय या शहरांत सर्व युरोपाच्या पेढींचा व्यापार संकलित होण्याचें आणखी एक मोठं कारण होतें. युरोपांत त्यावेळीं रोमन कॅथलिक धर्म सर्वत्र पसरलेला होता व या धर्माचा मुख्य धर्माध्यक्ष पोप हा रोम येथें रहात असे. युरोपांतील निरनिराळ्या देशांतून धर्माची बाब म्हणून जो एक कर असे त्यावर पोपसाहेबांचाच ताबा असे. हे कर-वसुलींचें कामही इटलीतील पेढीवाले करीत. हे पेढीवाले सावकारीचा धंदा करीत, कित्येक राजांस ते कर्ज देत असत, व कर्जाच्या व त्यावरील व्याजाच्या फेडीकरतां निरनिराळ्या करांच्या वसुलीचें काम यांचेकडे येई. अशा प्रकारचें या शहरांतील पेढीवाल्यांचें वैभव होतें. पूर्वी या पेढ्या खासगी गृहस्थांच्या असत. परंतु पुढें सरकारी पेढ्या निघूं लागल्या. तसेंच सरकारास कर्ज देण्याकरितां संयुक्तभांडवलाच्या तत्वावरही कांहींपेठ्या निघत. निरनिराळ्या देशांतील पेठ्या निरनिराळ्या कारणांनीं आस्तित्वांत आलेल्या आहेत.

पोर्तुगाल व स्पेन देशांनंतर वसाहतीच्या कामांत हाॅलंड फार पुढें गेलें; आशियांत व अमेरिकेंत त्या देशाच्या पुष्कळ वसाहती झाल्या व इंग्लंडचें वर्चस्व वाढण्यापूर्वी ने-आणण्याचा सर्व व्यापार त्यांचेच हातांत होता. यामुळे हाॅलंड देशांत पुष्कळ देशांतील नाणीं येत. हॅालंड देश मूळचा लहान असल्यामुळे त्या देशाचें स्वतःचें नाणें फार थोडें होतें. दुसऱ्या देशांतली नाणीं पुष्कळ झिजलेली व कमी किंमतीचीं वगैरे असत. नाण्यांच्या या गोंधळामुळे हॅालंडचा व्यापारांत तोटा होऊं लागला. झिजलेल्या नाण्यांवर कसर द्यावी लागल्यामुळे हॅालंड देशाचें नुकसान होऊं लागले. हॅालंड देशानें नवें चांगलें नाणे पाडण्यातही अर्थ नव्हता. कारण तें नाणें ग्रेशॅमच्या नियमानुरूप लगेच बाहेर देशीं जाई. ही अडचण दूर करण्याकरितां आमस्टर्डाम येथें एक मोठी पेढी निघाली. ही सरकारच्या आश्रयाखालीं निघाली. ही पेढी सर्व प्रकारची नाणीं त्याच्या ख-या किंमतीस घेत असे व नाणीं आणणा-या माणसांस पेढीच्या नांवाच्या नोटा मिळत. कांहीं एका रकमेनंतर करावयाच्या भरण्यास या पेढीच्या नोटा व पेढीचें नाणे दिले पाहिजे,असा सरकारी ठराव असल्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्यास या पेढीशीं आपला व्यवहार ठेवणें भाग असे. या व्यवस्थेपासून या ब्यांकेच्या नोटांची देशांत व बाहेर इतकी पत वाढली कीं, या पेढीच्या नोटांकरितां थोडी कसर द्यावी लागे.