पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२६]

 दाखला व उपमा देऊन तें विषद करण्याची हातोटी मिल्लला उत्तम साधली होती. यामुळें त्याचें पुस्तक फार लोकप्रिय झालें, इतकेंच नव्हे तर अर्थशास्त्रांतील तत्वें व प्रमेयें हीं सामाजिक प्रश्नांना कशीं लागू करावयाचीं याचाही त्यानें ऊहापोह केला असल्यामुळें तें पुस्तक अॅडम स्मिथच्या पुस्तकांपेक्षांही जास्त महत्वाचें आहे असें लोकांस वाटलें. मिल्लनें या शास्त्राच्या तार्किक पद्धतीचें समर्थन केलें आहे व बहुतेक ठिकाणी रिंकार्डोचीं मतेंच प्रतिपादन केलीं आहेत.
 मिल्लच्या पहिल्या ग्रंथांत पांच विषयांवर पांच निबंध आहेत. पहिल्या निबंधाचा विषय म्हणजे राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापाराचे नियम हा होय. यामध्यें मिल्लनें असें दाखविलें आहे कीं, दोन देशांचा दोन मालांमध्यें व्यापार सुरू झाला तर त्या देशांची मागणी अशी होते कीं एका मालाची किंमत दुस-या मालाबरोबर होते. म्हणजे जरी राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापार पैशाच्या योगानें चालला तरी ता ऐनजिनसी अदलाबदलीसारखा असता व कांहीं विशेष कृत्रिम कारणें अस्तित्वांत नसलीं म्हणजे देशांतील आयात व निर्गत माल याची अदलाबदल होऊन व्यापाराची तोंडमिळवणी होते. या निबंधांतील तत्वांचें मिल्लनें आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत "राष्ट्रांराष्ट्रांतील मागणीचें समीकरण" या नांवाखालीं विवेचन केलें आहे. दुस-या निबंधाचा विषय 'संपत्तीच्या व्ययाचा उत्पत्तीवर परिणाम' हा होय. यामध्यें सुखवस्तु लोक आपलें खेडेगांवांतील उत्पन्न शहरांत राहून खर्च करितात याचा देशाच्या संपत्तीवर काय परिणाम होतो याचा मिल्लनें विचार केला आहे व जरी कायमचा संपत्तीच्या उत्पत्तीचा अतिरेक होणें शक्य नाहीं तरी क्षणिक अतिरेक होणें शक्य आहे हें सिद्ध केलें आहे. तिस-या निबंधांत उत्पादक व अनुत्पादक या शब्दांच्या व्याख्या ठरविण्याचा मिल्लनें प्रयत्न केला आहे; चवथ्यामध्यें व्याज व नफा यांचा विचार केला आहे व त्यामध्यें नफा हा मजुरीवर कसा अवलंबून आहे, या रिकार्डोच्या तत्वाचें स्पष्टीकरण केलें आहे; व शेवटच्या निबंधांत अर्थशास्त्राची व्याख्या व त्याची शास्त्रीय पद्धति याचा विचार केला आहे, व येथें मिल्लनें रिकार्डोच्या तार्किक पद्धतीचें समर्थन केलें आहे.
 यानंतरचा मिल्लचा ग्रंथ म्हणजे त्याचा प्रसिद्ध अर्थशास्त्रावरील ग्रंथ होय. वर सांगितलेंच आहे कीं, या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्याची