पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३५५ ]

मयपरिमाण होय. आतां पैशाला या दोन कल्पना लागू पडत नाहींत. तरी पण केव्हां केव्हां पैशासंबंधींही या दोन कल्पनांचा उपयोग करतात. पैशाची किंमत म्हणजे कोणत्याही देशांतील कायद्यानें ठरलेलें पैशाच्या धातूचें वजन होय. या दृष्टीनें पौंडाची किंमत म्हणजे एक पौंड मिळण्यास टांकसाळींत भरावें लागणारें सोनें होय. ही किंमत अर्थात कायदा बदलला नाहीं तोंपर्यत कायमच राहाणार. इंग्लडमध्यें एक चलनपद्धति कायमची १८१६ मध्यें ठरली. त्या चलनीनाण्याच्या कायद्यांत नमूद केलेलें पौंडाच्या धातूचें वजन या कायद्यांत फरक होईपर्यंत कायम राहणार हें उघड आहे. तेव्हां पेशाच्या किंमतीबद्दल कांहींएक वाद किंवा भानगड असण्याचा संभव नाहीं. ती गोष्ट प्रत्येक देशांतील कायद्यानें मुक्रर केलेली आहे.

आतां पैशाचें मोल म्हणजे काय व तें कशावर अवलंबून आहे हें पाहिलें पाहिजे. पैशाचें मोल म्हणजे त्याची इतर सर्व पदार्थ विकत घेण्याची शक्ति अथवा क्रयणशक्ति होय. व ही क्रयणशक्ति पदार्थाच्या किंमतीच्या सरसकट मानावर अवलंबून आहे. पैशाचें मोल एखाद्या देशांत वाढत आहे कीं कमी होत आहे हें पहावयाचें असल्यास त्या देशांतील निरनिराळ्या काळच्या पदार्थांच्या किंमतींच्या सरसकट मानाची तुलना केली पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेचा शोध लागण्यापूर्वीच्या युरोपच्या मध्ययुगांत एकंदर सर्व पदार्थाच्या किंमतीचें सरसकटमान पुष्कळ कमी होतें. अर्थात् सर्व पदार्थ अत्यंत स्वस्त होते; परंतु अमेरिकेंतील सोन्यारुप्याच्या खाणींच्या शोधानंतर युरोपांत सोन्यारुप्याचा ओघ सुरू झाला व देशांत पैसा विपुल झाला व एकंदर सर्व पदार्थाच्या किंमतींचें मान चढले. म्हणजे मध्ययुगांत पैशाचें मोल पुष्कळ होतें तें पुढें कमी कमी होत गेलें. हिंदुस्थानांतही असाच प्रकार झालेला दिसून येतो. ऐनेअकबरींत दिलेल्या निरनिराळ्या पदार्थाच्या किंमतींचें मान व आतांच्या त्याच पदार्थाच्या किंमतींचें मान यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर पडलें आहे असें दिसून येतें; अर्थात त्या काळीं पैसा दुर्मिळ होता व म्हणून त्याचें मोल फार होतें. परंतु अर्वाचीन काळीं पैसा विपुल झाल्यानें पैशाचें मोल कमी झालें आहे, तेव्हां पैशाचें मोल पैशाच्या दुर्मिळतेवर अगर विपुलतेवर असतें, असें होतें. याला अभिमतअर्थ-