पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३५२]

कमिटीच्या रिपोर्टानुरुप हिंदुस्थान सरकारनें १८९३ मध्यें टांकसाळी बंद केल्या.

हिंदुस्थानच्या औद्योगिक स्थितीवर या धोरणाचा सुपरिणाम होईल किंवा दुष्परिणाम होईल व अर्थशास्त्रदृष्ट्या स्वीकारलेलें धोरण बरोबर आहे किंवा नाही, याबद्दल त्या काळीं मोठमोठ्या मुत्सदयांमध्यें तीव्र मतभेद होता. परंतु त्या वादांत येथें शिरण्याचें प्रयोजन नाही. जगातील सोन्यारुप्यांच्या भावांतील चलबिचलीनें उद्भवलेल्या अडचणी दूर करण्याचा खरा मार्ग म्हणजे सर्व प्रमुख राष्ट्रांनीं संगनमतानें द्विचलनपद्धति स्वीकारणें होय, हें मागच्या भागांत सविस्तरपणें दाखविलें आहे. परंत ब्रिटिश सरकारच्या, आपली चलनपद्धति न बदलण्याच्या निश्चयामुळे हा मार्ग खुला नव्हता. तेव्हां हिंदुस्थानसरकारला दुसरा आपल्या हातचा शक्य तो मार्ग स्वीकारावा लागला व वर सांगितल्याप्रमाणें १८९३ मध्यें हिंदुस्थानसरकारनें चांदीला टांकसाळी बंद केल्या. व नवीन रुपये न पाडून त्यांची संख्या कमी करून रुपयाची किंमत कृत्रिम त-हेनें वाढवून हिंदुस्थानसरकारनें आपल्या अडचणींतून पार पाडण्याची योजना अंमलांत आणली. या कायद्यानें हिंदुस्थानच्या चलनपद्धतींत अजून फरक घडवून आणला नाहीं. चलनपद्धति एकचलनपद्धतीच राहिली. मात्र लोकांना चांदी देऊन रुपये पाडण्याचा हक्क राहिला नाही. या कायद्याचा इष्ट तो परिणाम होऊं लागला व हुंडणावळीचा भाव वाढत चालला व या कायद्यानें ठरविलेल्या भावावर-अर्थात १ शिलिंग ४ पेन्सांवर-हुंडणावळीचा भाव येऊन ठेपला. पुढें हिंदुस्थानसरकारच्या धोरणाच्या परिणामाचा विचार करण्याकरितां १८९८ मर्थ्य फ़ाऊलर कमिटी नेमण्यांत आली व त्या कमिटीनें हिंदुस्थानांत सोन्याचें पौंड नाणें-१ शिलिंग ४ पेन्स = एक रुपया-या भावानें कायदेशीर फेडीचें चलन करावें, असा अभिप्राय दिला. व तदनुरुप १८९९ मध्यें हिंदुस्थानसरकारनें सोन्याच्या नाण्याची पद्धति स्वीकारली. यायोगें हिंदुस्थानांतील पद्धति लॅटिन युनियनच्या पद्धतीशीं समरूप झाली. या पद्धतीलाच अर्थशास्त्रकारांनीं लंगडी द्विचलनपद्धात म्हटलें आहे. या पद्धतींत द्विचलनपद्धतीच्या तीन अंगांपैकीं एक अंग कमी असतें. म्हणजे येथें दोन्ही धातूंचीं नाणीं अमर्याद प्रमाणांत चालतात. दोन्ही धातूंमधील भावाचें प्रमाण काययानें ठरविलें जातें. मात्र दोन्ही