पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३५०]

कारक वाटू लागली. शिवाय १८१६ मध्यें इंग्लंडांत सोन्याचें एकचलन कायमच स्थापित झालें.तेव्हां हिंदुस्थान हा देश गरीब आहे, हिंदू लोकांना सोन्यापेक्षां रुपें जास्त आवडतें वगैरे प्रकारच्या इंग्रजी अंमलदारांच्या समजामुळें जरी हिंदुस्थानांत द्विचलनपद्धति होती तरी ती टाकून रुप्याची एकचलनपद्धति १८३५ मध्यें सुरू केली गेली. सर्व हिंदुस्थानच्या एकचलनपद्धतीस याच वेळीं प्रारंभ झाला असें म्हटलें तरी चालेल. १८० ग्रेनचा रुपया हेंच एकटें कायदेशीर फेडीचें चलन ठरविलें गेलें. त्यांत १०० भारांत ९१ याप्रमाणें शुद्ध चांदी असते. चांदीला १८९३ पर्यंत टांकसाळी खुल्या होत्या. सारांश हिंदुस्थानची १८९३ पर्यंत इंग्लंडप्रमाणेंच एकचलनपद्धति होती. मात्र सोन्याच्या ऐवजीं येथें चांदी ही कायदेशीर फेडीचें चलन ठरलें गेलें १८३५ चा कायदा झाला तरी १८५२ पर्यत सरकार सोन्याचीं नाणीं तिजोरींत स्वीकारीत असे व १८५४-५५ मध्यें ४१२००० पौंडांचें नाणें हिंदुस्थानांतून सरकारनें विलायतेस पाठविलें होतें. तसेंच हिंदुस्थानांत सोन्याचा ओघही कमी नसे. १८६२ पासून १८७० पर्यंतच्या आठ वर्षांत हिंदुस्थानांतु ५ कोटी पौंडांचें सोनें आलें असें दिसतें. १८६४ मध्यें सर चार्लस ट्रेंव्हेलिननें हिंदुस्थानांत ब्रिटिश पौंड हैं सोन्याचें नाणें सुरू करावें अशा त-हेची एक सूचनाही केली होती.

परंतु १८३५ मध्यें सुरू केलेली एकचलनपद्धति चांगल्या त-हेनें चालत असल्यामुळे त्यांत फरक करण्याचें सरकारचे मनांत आलें नाहीं. परंतु मागील भागांत सविस्तरपणें वर्णन केलेल्या युरोपांतील घडामोडींनीं व चांदीच्या वाढत्या पैदाशीनें चांदीचा भाव १७८३ नंतर उतरणीस लागला. १८५८ मध्यें हिंदुस्थानचें राज्य प्रत्यक्ष राणी सरकारच्या हातीं गेल्यापासून हिंदुस्थानचा विलायतेंतील खर्च झपाट्यानें वाढत चालला होता. तसेंच १८५७ सालच्या बंडाच्या शमनार्थ लागलेला खर्च व त्याच सुमारास हिंदुस्थानांत सुरू झालेल्या रेल्वेचा खर्च यांनीं हिंदुस्थानचें कर्ज वाढत चाललें व होमचार्जेसचा खर्च भराभर वाढत चालला व हुंडणावळीचा भाव जसजसा उतरत चालला तसतसे हिंदुस्थानांतून दरवर्षी विलायतेस जास्त जास्त रुपये पाठविणें भाग पडू लागलें व त्यामुळें हिंदुस्थानच्या तिजोरीची तारांबळ उडू लागली; व हिंदूस्तानला आपल्या चलनपद्धतींत फरक करण्याची अवश्यकता भासूं लागली.