पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३४८ ] परंतू हिंदुस्थानची या बाबतींत इतिहासाच्या अभावामुळे संगतवार माहिती मिळणें शक्य नाहीं. शिवाय हिंदुस्थानामध्यें पूर्वकाळीं हजारों स्वतंत्र राज्यें होतीं. अर्थात् हिंदुस्थान हें एका खंडासारखें होतें व ज्याप्रमाणें युरोपांतील चलनपद्धति या शब्दप्रयोगाला अर्थ नाहीं तसाच प्रकार हिंदुस्थानांत होता. हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळ्या तऱ्हेचीं नाणीं चालू असत. परंतु सामान्यतः हिंदुस्थानांत बरींच शतकेंपर्यंत स्वाभाविक द्विचलनपद्धति सुरू होती असें ह्मणण्यास हरकत नाहीं. ह्मणजे येथेंही युरोपसारखीच स्थिति होती. हिंदुस्थानचा बराच मोठा भाग अकबराच्या कारकीर्दीतच एका छत्राखालीं आला व त्या राज्यांतील सर्व सुधारणेबरोबर नाण्यांच्या पद्धतीलाही व्यवस्थित स्वरूप दिलें गेलें असें ऐनेअकबरीवरून दिसतें. या ग्रंथांत यासंबंधीं बरीच माहिती दिलेली आहे. पूर्वी नाण्याच्या टांकसाळी पुष्कळ ठिकाणीं असत व त्या खासगी होत्या; परंतु अकबरानें हा सर्व घोंटाळा मोडून टांकसाळीचे मुख्य व गौण असे भेद करून त्यांची एकंदर संख्या कमी केली. सर्व प्रकारच्या नाण्यांच्या चारच मुख्य टांकसाळी ठरविल्या. एक आऱ्यास, एक बंगाल्यांत, एक अहमदाबादेस, गुजराथेंत व एक काबुलांत. रुपें व तांबें यांचीं फक्त नाणीं पाडण्याकरितां आणखी दहा ठिकाणीं परवानगी दिली होती व तांब्याचे पैसे पाडण्याकरितां विस्तीर्ण देशभर आणखी २४ ठिकाणें ठरविलीं होतीं. ऐनेअकबरींत अकबराचे काळीं चालू असलेल्या नाण्यांची माहिती दिलेली आहे; त्यांचा आकार कसा होता; त्यांचें वजन किती होतें; दुसऱ्या नाण्याशीं कोणत्या प्रमाणांत त्यांचा विनिमय होई, त्यावर काय अक्षरें व वाक्यें खोदलेलीं होतीं, वगैरे हकीकत ऐनेअकबरीवरून मिळते. यावरून अकबराचे काळीं सोनें, रुपें व तांबें अशा तीन धातूंचीं नाणीं पाडीत असत असें दिसतें. सोन्याचीं नाणीं पुष्कळच जातीचीं होती. रुप्याचें नाणें रुपये हें होतें व तांब्याचे नाणें दाम हें होतें. व सर्व मुसलमानी रियासतींत बहुतेक सर्व हिंदुस्थानांत स्वाभाविक द्विचलनपद्धतीच चालू होती. होन,मोहोर,दिनार हीं सोन्याचीं नाणीं सामन्यतः असत. विशेष प्रचारांतील सोन्याचें नाणें म्हणजे मोहोर हेचं होय व हा शब्द पर्शियन भाषेंतील असून त्याचा अर्थ शिक्का असा आहे. तेव्हां सोन्याच्या तुकड्यावर राजाचा शिक्का उठवून नाणीं पाडण्याची रीत होती असें व्युत्पत्तीवरून दिसतें.