पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३४६] काळपर्यंत सारखें युद्ध चालू होतें व कांहीं काळपर्यंत कोणत्या पद्धतीचा जय होईल हें सांगणें कठीण होतें. तात्विकदुष्ट्या द्विचलनपद्धतीचा विजय व्हावयास पाहिजे होता; परंतु जगांत तात्विक दृष्टीनें गोष्टी घडतात असा नेम नाहीं. त्यामध्यें आकस्मिकपणा ह्मणून एक भाग असतो. त्याचप्रमाणें येथें प्रकार झाला. आकस्मिक कारणांनीं इंग्लंडांतील नाणें सोन्याचेंच बहुशः झालें होतें. इंग्लंडाच्या वाढत्या व्यापाराच्या याेगानें इंग्लंड संपन्न होत चाललें होतें.चांदीचा भाव उतरत जाणार कीं काय अशी शंका त्या वेळच्या मुत्सद्यांना वाटली. यामुळें १८१६ मध्यें इंग्लंडनें सोन्याची एकचलनपद्धति स्वीकारली. सारख्या सामर्थ्याच्या टग ऑफ वारच्या खेळामधील खेळाडूंच्या दोन पक्षांत विजयश्री कोणत्या पक्षाला माळ घालील हैं सांगणें ज्याप्रमाणें कठीण असतें त्याप्रमाणें १८१६ पासून १८७३ पर्यंत एकचलन व द्विचलन यांमध्यें कोणीकडे विजयश्री जाईल हें सांगणें कठीण होतें. पुरंतु १८७३ मध्यें जर्मनीनें इंग्लंडचा मार्ग स्वीकारला व मग ज्याप्रमाणें टग-ऑफ-वारमध्यें कांहीं काळपर्यंत दोन्ही बाजू सारख्या जोराच्या राहून दोरी मधल्यामध्यें राहावी, परंतु एकदां का एकीकडे जोर झाला ह्मणजे मग मात्र दुस-या बाजूचे गडी फरफटत ओढीत नेले जावे, त्याप्रमाणें इंग्लंड व जर्मनी या दोन बलाढ्य राष्ट्रांची शक्ति एकवटल्यामुळें एकचलनपद्धतीच्या बाजूचा जोर जास्त झाला, व जरी लॅटिन युनियन व अमेरिका यांनीं द्विचलनाच्या बाजूला बरीच ओढ धरली तरी या चलनयुद्धाचा शेवट ठरल्यासारखाच झाला व मागें लिहिल्याप्रमाणें हिंदुस्थानसारख्या अवाढव्य देशानें चांदीला निर्निष्कत्व दिल्याबरोबर एकचलन व द्विचलन यांमधील युद्ध संपून सर्व देश एकचलनपद्धतींकडे फरफटत नेले गेले.