पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. १८०१ पासून १८१० पर्यंत किंमतीनें चांदीची उत्पत्ति सोन्याच्या तिप्पट होती तर १८५६ ते ६० या सालांत सोनें रुप्याच्या तिप्पट निघूं लागलें. तरीसुद्धां सोन्यारुप्याचा भाव स्थिर राहिला. नेपोलियनच्या काळच्या लढाया व अमेरिकेंतील अन्तर्युध्द इतक्या जगास खळबळून टाकणा-या घडामोडींतही सोन्यारुप्याचा भाव स्थिर राहिला. परंतु १८७३ पासून मात्र या भावांत क्रांतिकारक फरक पडत चालला; तो कां याचें विवेचन पुढें येईल. आतां अन्तर्राष्ट्रीय व्दिचलनपद्धतीच्या योजनेचे फायदे दाखवून हा तात्विक वाद संपविणें बरे अन्तर्राष्ट्रीय व्दिचलनाचे फायदे अगदीं उघड आहेत. सोन्यापेक्षां रुप्याची किंमत एकंदरींत जास्त स्थिर असे असें पूर्वेतिहास सांगतो. तेव्हां जर कायम भावानें सोन्यारुप्याची सांगड घालून दिली तर दोन्ही धातू जास्त स्थिरपदाप्रत पावतील. सर्व जगामध्यें लोकवस्ती वाढत आहे व उद्योगवृद्धि होत आहे. अशा वाढत्या लोकवस्तीला व वाढत्या व्यापारधंद्याला वाढत्या पैशाचा पुरवठा पाहिजे व व्दिचलनाने असा पुरवठा जास्त वाढवितां येईल. शिवाय संपत्तीच्या वाढीबरोबर सोन्यारुप्याचा कलाकौशल्याच्या कामाला जास्त उपयोग होतो व यामुळे त्या कामाला सोनेरुपें जास्त लागतें. मोठ्या प्रमाणावरील व्यापारानें नाण्याची झीजही जास्त वाढते, व ही झीज भरून काढण्याकरितां दर वर्षास बरेंच सोनेंरूपें लागतें. परंतु यापेक्षां मोठा फायदा म्हणजे सर्व जगाची चलनपद्धति एक होईल व सोनें वापरणारे देश व चांदी वापरणारे देश या देशांच्या व्यापारामधील अनिश्चितता नाहींशी होईल. या योगानें सर्व जगाचा व्यापार वाढेल. ज्या ठिकाणीं भांडवल कमी आहे त्या ठिकाणीं तें सहज जाईल. औद्योगिक बाबताींत मागसलेल्या देशाची भरभराट जलदीनें होईल. सारांश, वजनाच्या बाबतींत सर्व ठिकाणीं एक पद्धति असणें हें ज्याप्रमाणें सर्वस्वी फायद्याचें आहे; ज्याप्रमाणें पेास्टाच्या कामांत सुधारलेल्या जगांत संगनमत झालेलें आहे; ज्याप्रमाणें रेल्वेच्या बाबतींतही निरनिराळ्या देशांतील पद्धतींमध्यें एकसूत्रीपणा आणलेला आहे; त्याप्रमाणेंच पैशाच्या बाबतींत सर्व जगाचा जर एकोपा होईल तर ती गोष्ट इष्ट आहे यांत शंका नाहीं. शिवाय वरील दाखल्यांत सांगितल्याप्रमाणें प्रत्येक देशाचें स्वातंत्र्य यांत कमी होत नाहीं, किंवा त्यांची व्यवस्था नाहींशी होत नाहीं, किंवा देखरेख कमी होत