पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३३२] बाहेर घालवितो. कारण माल हा लोकांना उपभोगावयाचा असतो. यामुळे वाईट वस्तु काेणीच घेणार नाही; परंतु पैशाच्या प्रत्यक्ष उपभाेग घ्यावयाचा नसतो. त्याचा उपयोग फक्त अदलाबदलीपुरताच असतो. यामुळे लोक स्वीकारतात किंवा नाहीं हाच पैशाच्यासंबंधींचा महत्वाचा प्रश्र असतो. मग तो पैसा हलका असो की जड असो. म्हणून होतां हाईल तों हलका पैसा हा व्यवहारांत राहतो व जेव्हां पैशाचा उपभोगार्थ उपयोग करावयाचा असेल तेव्हां त्यांतील धातुगत किंमतीकडे लोकांचें लक्ष लागतें. यावरूनही पैसा पाडणें ही गोष्ट खासगी लोकांच्या हातीं ठेवणें किती नुकसानाचें आहे हें दिसून येईल; कारण इतर भागांत चांगला माल तयार करण्यात कारखानदारांचें हित असतें. परंतु पैशाच्यासंबंधांत याच्या उलट स्थिति आहे.

भाग आठवा. द्विचलनपद्धति. मागील भागांत धात्वात्मक पैशाच्या चलनपद्धतीचें वर्गीकरण करून त्याचें थोडक्यांत विवेचन केलें. पांच चलनपद्धतींपैकी संमिश्र चलनपध्दति व लंगडी द्विचलनपद्धति याच प्रमुखत्वेंकरून अस्तित्वांत आहेत, असें मागील भागांत संगीतलें; परंतु कांही वर्षापुर्वी द्विचलनपद्धतिचा प्रसार फार ठिकाणीं होता असें इतिहासावरून दिसतें. तेव्हां या पद्धतीचा विशेष तऱ्हेनें विचार करणें जरूर आहे. कारण द्विचलनपद्धति सर्व जगात स्वीकारली जाण्यास योग्य आहे ह्राणून अशा पद्धतीचा अंगीकार जगांतल्या प्रमुख राष्टांनीं करावा अशाबदल कांहीं अर्थशास्त्रकरांनी व कांही देशांतील मुत्सयांनी सूचना केल्या होत्या व ही योजना सर्वांत जास्त फाययाची आहे असें त्यांनीं प्रतिपादन केलें होतें. अर्वाचीन काळीं जगांतील प्रमुख राष्ट्रांनीं एकचलनात्मक पद्धतीचाच अंगीकार केला आहे व इतर राष्ट्रे त्याच पद्धतीचा अवलंब करण्याच्या विचारांत आहेत.