पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पैशाच्या द्रव्यांतील शेवटला गुण ह्मणजे त्याची अभिज्ञेयता होय. पैसा हा सर्व व्यवहारांत नेहमीं येणारा पदार्थ आहे. तेव्हां ते खरा आहे कीं खोटा आहे हें ताबडतोब ओळखतां यावें. ह्मणजे त्यामध्यें दृष्टीस पडल्याबरोबर ओळख पटेल अशा त-हेचे गुण असावे तर त्या द्रव्याकडून पैशाची कार्यें उत्तम तऱ्हेनें पार पडतील. 
 हे सर्व गुण कमीअधिक प्रमाणानें पैशाच्या द्रव्यामध्यें पाहिजेत. व हे सर्व गुण धातूमध्यें जितक्या प्रमाणानें सांपडतात तितक्या प्रमाणानें दुस-या कोणत्याही द्रव्यांत सांपडत नाहींत. म्हणूनच धातूमय पैशाच्या द्रव्यांनीं इतर सर्व द्रव्यांना मागें टाकिलें आहे व थोड्याफार उन्नतीच्या मागील लागलेल्या राष्ट्रामध्यें धातूचाच पैसा दिसून येतो.
 आतां जितक्या जितक्या धातू पृथ्वीवर आजपर्यंत सांपडलेल्या आहेत त्या सर्वांचा केव्हांना केव्हां तुरी व कोणत्याना कोणत्या तरी देशानें पैशाचें द्रव्य ह्मणून उपयोग केला आहे. लोखंड, शिसें, कथील, तांबे, रुपें, सोनें, प्लाटिनम व निकल इतक्या निरनिराळ्या धातूंचीं किंवा त्यांच्या मिश्रणाचीं नाणीं निरनिराळ्या देशांत पाडलेली आहेत. परंतु या सर्व धातूंमध्यें सोन्या-रुप्याचाच सर्वांत वर नंबर लागलेला आहे. कारण वर निर्दिष्ट केलेले साती गुण सोन्या-रुप्यांत जितक्या प्रमाणानें वास करीत आहेत तितक्या प्रमाणानें दुस-या कोणत्याही धातूंत ते दृष्टीस पडत नाहींत. यामुळे सोन्या-रुप्यांच्या धातू याच पैशाच्या द्रव्याला सर्वात उत्तम धातू होत असें सर्व देशाच्या प्रचारावरून दिसून येतें.
 आतां या पैशांची व्यवहारांत रुपें कोणतीं असतात व धात्वात्मक पैशाच्या निरानराळ्या पद्धती कोणत्या व त्या पद्धतींपैकीं सर्वांत उत्तम पद्धति कोणती हें ठरवावयाचें आहे. परंतु या विषयाचा एका स्वतंत्र भागांत विचार करणें चांगलें.